प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा कुर्‍हाडीने खून करून घाटात फेकल

सप्तश्रृंगी गडावरील सुरक्षारक्षक हत्येचा उलगडा

नाशिक : श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील देवी ट्रस्टमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या अर्जुन अंबादास पवार याच्या खुनाचा उलगडा अखेर झाला असून, प्रेमात अडथळा ठरणार्‍या प्रेयसीच्या पतीला खून करुन संपवून टाकण्यात आल्याचे या घटनेत आता उघड झाले आहे. पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कळवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्तशृंगी गड येथील रहिवाशी अर्जुन अंबादास पवार (वय ३०, काही वर्षापासून रहिवास सासुरवाडी-भेंडी, ता. कळवण) हा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. सध्या तो भेंडी ते सप्तशृंगीगडावर दुचाकीने ये-जा करत होता. मंगळवारी (दि. १२) सप्तशृंगीगडावर रात्री साडेआठच्या सुमारास कर्तव्यावर जाताना संशयित आरोपी रामदास पवारने गडावरील धुके आणि पावसाचा फायदा उठवत रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घाटरस्त्यावरील एका धबधब्याजवळ अर्जुन पवारवर कुर्‍हाडीने वार करत त्याला ठार केले. मात्र, सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला येणार्‍या भाविकांनी घाटात पडलेल्या या मृतदेहाबाबत पोलिसांना कळवले. त्यानुसार शवविच्छेदन करण्यात येऊन प्राथमिक अहवालात मानेवर व चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले होते. त्यानुसार अधिक तपास केला असता पोलिसांना अर्जुनच्या पत्नीच्या प्रियकरानेच हा खून केल्याचे दिसून आले.