राष्ट्रवादी युवक कडून नायलॉन मांजांची होळी

नाशिक । नायलॉन मांजामुळे शहरात एका महीलेला आपले प्राण गमवावे लागले या घटनेचा नागरीकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतांनादेखील सर्रासपणे हा मांजा विकला जातो. त्यामुळे प्रशासनाचे आदेश केवळ कागदावरच राहतात. त्यामुळे अशा घटना गांभीर्याने घेण्याची गरज असून अशा नायलॉन मांजाची छुप्यापद्धतीने विक्री करणार्‍यांवर व मांजा वापरणार्‍यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी केली. यावेेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.
पतंग उडविताना अधिक उत्तम दर्जाचा दोरा वापरण्यासाठी चढाओढ वाढत असल्याने न तुटणार्‍या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच बंद लावली असून सूद्धा शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे. प्रशासनाकडून दरवर्षी मोठ्या संख्येने नायलॉन मांजा जप्त करण्यात येतो. तरी सुद्धा या मांजाचा वापर कमी होताना दिसत नाही. नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात घडत असतात. या अपघातात अनेक नागरिक मृत्यू झाला असून पक्ष्यांच्या मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. नायलॉन मांजा घातक असल्याबरोबरच न तुटणारा असल्याने अनेक जीवघेणे अपघात घडतात. दुचाकी वाहनाने घरी परतत असताना सोमवारी अचानकपणे पतंगीचा तुटलेला नायलॉन मांजा एका महिलेच्या गळ्यावर घासला गेल्याने महिलेचा गळा चिरला जाऊन जागीच मृत्यू झाला. अशा अनेक घटना घडत असून नायलॉन मांजा प्रत्येक झाडावर लोंबकळताना दिसतो. या मांजात अनेक पक्षी अडकतात व त्यांचाही मृत्यू होतो. अशा नायलॉन मांजाची छुप्यापद्धतीने विक्री करणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळा निगळ, निलेश भंदुरे, विकास सोनवणे, शिवराज ओबेरॉय, जय कोतवाल, मुकेश शेवाळे, अंकुश वराडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.