रात्रीच्या घरफोड्या करणारी हुक्का टोळी जाळ्यात

चोरट्यांकडून ८ गुन्हे उघडकीस

रात्रीच्या वेळी घरफोड्या करणारी हुक्का टोळीच्या मुसक्या आवळ्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून १८ ग्रॅमचे मंगलमूत्र, सोन्याची नथ, चार लॅपटॉप, गॅस सिलेंडर शेगडी, आयफोन मोबाईल, मिक्सर, स्टीलची पंचपात्री, जरमलचे डब्बे, चांदीचे ताट व फुलपात्रे, सुट्टे पैसे असा एकूण ४ लाख ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, दोन आरोपी तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार आहेत.

बाबू पप्पू अन्सारी ऊर्फ साहेल, दीपक पितांबर गायकवाड, वसीम अब्दुल रेहमान शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मुंबई नाका व भद्रकाली परिसरात रात्रीच्या वेळी वारंवार घरफोड्या, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. तिघांनी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत सहा घरफोड्या व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

कठोर कारवाई करणार

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या कालवधीत मुंबई नाका व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या घडत होत्या. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. बाबू अन्सारी व वसीम शेख यांनी तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली जाणार आहे.
अमोल तांबे
पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक