Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक पुरेसे इंजेक्शन्स मिळत नसल्याने आम्ही उपचार करायचे तरी कसे?

पुरेसे इंजेक्शन्स मिळत नसल्याने आम्ही उपचार करायचे तरी कसे?

खासगी हॉस्पिटल्सचा जिल्हा प्रशासनाला संतप्त सवाल; अ‍ॅम्फोटेरेसिन मिळत नसल्याने उपचारांचे आव्हान वाढले

Related Story

- Advertisement -

म्युकरमायकोसिस आजार रोखण्यासाठी अ‍ॅम्फोटेरेसिन-बी हे बुरशीप्रतिबंधक इंजेक्शन प्रभावी असल्याने मागणी वाढून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणांनी वितरणाची सूत्रे हाती घेऊनही पुरेसे इंजेक्शन्स उपलब्ध होत नसल्याने, आम्ही उपचार तरी कसे करायचे, असा संतप्त सवाल खासगी हॉस्पिटल्सकडून उपस्थित केला जातो आहे.

अ‍ॅम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन्सचा रेमडेसिवीरसारखा काळा बाजार होऊ नये आणि गरजू रुग्णांनाच ते मिळावेत, या हेतूने जिल्हाधिकार्‍यांनी सिव्हिल हॉस्पिटल आणि महापालिका यांच्याकडे वितरण व्यवस्था सोपवली. या निर्णयाला दोन-तीन आठवडे उलटूनही उपलब्धतेबाबत मात्र ओरड कायम आहे. अनेकदा तक्रारी करुनही पुरेसे इंजेक्शन्स मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार कसे करावेत, असा प्रश्न खासगी हॉस्पिटल्समधील डॉक्टरांपुढे उभा ठाकला आहे.

- Advertisement -

अ‍ॅम्फोटेरेसिन-बीऐवजी इतर काही पर्याय असले तरीही ते तितके परिणामकारक नाहीत. तसेच, त्यापासून किडनीलाही धोका संभवतो. म्युकरमायकोसिस ही बुरशी असल्याने संसर्ग झाल्यानंतर ती अत्यंत वेगाने पसरते. विशेष म्हणजे काही रुग्णांमध्ये केवळ चार दिवसांत बुरशीची वाढ ही धोकादायक पातळीपर्यंत झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला प्राधान्य देऊन त्याच्यावर तातडीने निदान आणि उपचार करणे गरजेचे असते. या उपचारांत अ‍ॅम्फोटेरेसिन-बी हा महत्त्वाचा घटक असल्याने जिल्हा प्रशासनासह राजकीय स्तरावरूनही राज्य सरकारकडे नाशिकसाठी पुरेसे इंजेक्शन्स मिळण्यासाठी आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे.

सरकारी यंत्रणेवरच इलाजाची गरज
म्युकरमायकोसिस हा कोरोनापेक्षा अधिक जीवघेणा आजार आहे, हे लक्षात येऊन आता चार महिने लोटले आहेत. असे असूनही सरकारी पातळीवरुन मात्र अपेक्षित हालचाली होताना दिसत नाही. १८ मे रोजी इंजेक्शन्स उपलब्ध होण्याची जी स्थिती होती तिच स्थिती ७ जून रोजी कायम आहे. दुसरीकडे किंमतीवरुन सिव्हीलकडून खासगी हॉस्पिटल्सची दिशाभूल सुरू आहे. पैसे मोजूनही पुरेसे इंजेक्शन्स मिळत नसल्याने रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांना अत्यंत शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारी आरोग्य व्यवस्थेवरच इलाज करण्याची गरज आहे.

म्युकरमायकोसिस शरीरात अत्यंत वेगाने पसरतो. त्यामुळे अशा रुग्णावर तातडीने शस्त्रक्रीया करुनत्याला अ‍ॅम्फोटेरेसिन-बी द्यावे लागतात. यात दिरंगाई झाल्यात रुग्णाला दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. यंत्रणांनी रास्त दरात पुरेसे इंजेक्शन्स उपलब्ध करुन द्यावेत.
– डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए, नाशिक

रुग्णाची प्रकृती, आजाराची व्याप्ती याचा विचार करून त्याला डोस दिले जातात. प्रत्येक रुग्णाला दररोज किमान एक अ‍ॅम्फोटेरेसिन दिले पाहिजे. मात्र, सध्या खूप कमी वितरण होत असल्याने, आजारानुसार प्राधान्य देऊन हे इंजेक्शन्स देतो. अर्थात, काही पर्यायदेखील उपलब्ध आहेत.
– डॉ. सुदर्शन अहिरे,ईएनटी तज्ज्ञ

- Advertisement -