घोटी-भंडारदरा रस्त्याची झाली चाळण

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता

potholes

इगतपुरी तालुक्यातील नगर व नाशिक जिल्ह्यांना जोडणार्‍या घोटी-भंडारदरा या राज्य मार्गाची खेड गटातील पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्यापर्यंत गेल्या चार ते पाच वर्षांपासून दूरवस्था झाली आहे. खेड-टाकेद गटातील हा महत्त्वाचा मार्ग असून येथील परिसरातील नागरिकांना, रुग्णांना, विद्यार्थ्यांना, व्यापार्‍यांना व शेतकर्‍यांना नेहमी इगतपुरी, घोटी, नाशिकला जाण्यासाठी ये-जा करावी लागते.

या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. परिसरातील रुग्णांना, गरोदर महिलांना महत्त्वाच्या उपचारासाठी घोटी किंवा नाशिक या ठिकाणी जावे लागते. मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. खेडपासून घोटीला पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेला अर्धा तास अपेक्षित आहे, मात्र सध्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे रुग्णवाहिकेलाही उशीर लागत असल्याने रुग्णांच्या जीवाशीही खेळ होत आहे. तर या रस्त्यावर अपघातांचे देखील प्रमाण वाढले आहे. बाहेरून येणार्‍या पर्यटकांकडून परत या रस्त्याने प्रवास नको असे बोलले जात आहे.

गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी या मार्गाच्या नूतनीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून ९८ कोटींचा निधी मंजूर झाला असून, या वर्षीच्या पहिल्याच महिन्यात काम सुरू होईल, अशी चर्चा लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाकडून रंगवण्यात आली होती. मात्र अजूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.