‘शुभ’ कार्यात जाचक अटींचे ‘विघ्न’

विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालयांना आता कम्प्लिशन सर्टिफिकेटची अट

marriage

नाशिक :कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आली खरी, मात्र मंगल कार्यालयांसाठी नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. शिवाय विवाह सोहळ्यांच्या आयोजनासाठी कार्यालयाच्या पुर्णत्वाच्या दाखल्यासह शॉपअ‍ॅक्ट लायसन्स, महापालिकेची बांधकाम परवानगी प्रत, वधू-वर पित्याची जाबजबाबाला उपस्थिती अशा डझनभर अटी टाकण्यात आल्याने परवानगीअभावी कार्यालयचालकांवर बुकिंग रद्द करण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून लग्न समारंभास निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे अनेक विवाहयोग्य मुलामुलींचे विवाह रखडले होते. मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होताच विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध शिथिल करताना विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यापूर्वी सुमारे डझनभर परवानग्यांचे कागदपत्र सादर करण्याची अट मंगल कार्यालयांवर टाकण्यात आली आहे. हे पाहता परवानगीअभावी कार्यालयचालकांकडून बुकिंग नाकारले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे मंगल कार्यालये आणि यावर आधारित उद्योगांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असताना आता पुन्हा या जाचक नियमांमुळे अर्थचक्राला ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

कम्प्लिशनची अट

महापालिकेकडे अनेक कार्यालये, लॉन्स चालकांनी पुर्णत्वाच्या दाखल्यासाठी अर्ज केले आहे. मात्र, त्यांना दाखले मिळालेले नाहीत. कार्यालयच नव्हे तर शहरात अशा अनेक इमारती आहेत ज्यांना अद्याप बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळाल्याने त्यांची घरपट्टी लागू करण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या महासभेतही हा मुद्दा चर्चिला गेला.

या कागदपत्रांची सक्ती

 • पोलीस ठाण्याचा ना हरकत दाखला
 • नाशिक महापालिकेचा ना हरकत दाखला
 • वाहतूक शाखेचा ना हरकत दाखला
 • मंगल कार्यालय चालकांचे शॉपअ‍ॅक्ट लायसन्स
 • जीएसटी खात्याचे एनओसी अनिवार्य. अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला.
 • मंगल कार्यालय चालकांचे आधार व पॅनकार्ड वीज वितरण कंपनीचा ना हरकत दाखला.
 • कार्यालय चालक मालकांचा लेखी जबाब
 • महापालिकेची बांधकाम परवानगी प्रत
 • महापालिकेचे कम्प्लीशन सर्टीफिकेट
 • जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी
 • वधू वर पित्याची जाबजबाबाला उपस्थिती

मंगल कार्यालये, लॉन्स चालकांना विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यासाठी महापालिकेच्या कम्प्लिशन सर्टीफिकेटची अट टाकण्यात आली आहे. या प्रमाणपत्रासाठी महापालिकेकडे अर्ज करूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही, मात्र याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. त्यामुळे कम्प्लिशनची सक्ती करू नये, अशी आमची मागणी आहे. बुकिंग रद्द झाल्यास केटरिंग, घोडे, बँडवाले, फुलवाल्यांसह या घटकावर आधारित उद्योगांना फटका बसेल.
– सुनील चोपडा,अध्यक्ष, मंगल कार्यालय असोसिएशन