फेसबुकवरून ओळख : घटस्फोट घेतल्याचे सांगून महिलेवर बलात्कार

नाशिक : वैवाहिक असल्याचे लपवून फेसबुकवरून ओळख झालेल्या महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून युवकाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी युवक, त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित विनोद वसंत ढाकणे (४५, रा. भाऊसाहेब हिरेनगर, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत संशयितांनी महिलेवर बलात्कार व फसवणूक केली. संशयित विनोद ढाकणे यांनी फेसबुकवरून ओळख करून पीडितेसोबत विवाह केला. विवाहाआधी संशयित विनोद यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचे पीडित महिलेस सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी घटस्फोट घेतलेला नव्हता. ही बाब विनोद यांच्या आई-वडिलांनीही लपवून ठेवली. विनोद यांनी पीडितेवर वारंवार बलात्कार करून महिलेचा छळ केला.