घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळांना शिवसेनेत घेतले तरी पराभूत करु!

भुजबळांना शिवसेनेत घेतले तरी पराभूत करु!

Subscribe

येवल्यातील नेत्यांचा तीव्र विरोध: खासदार संजय राऊत यांच्यासमोर मांडली भूमिका

राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशास येवल्यातील नेत्यांनी तीव्र विरोध केला असून, त्यांना प्रवेश दिला तरी यंदा भुजबळांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याचा इशारा येथील नेत्यांनी दिला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या आढावा बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे खासदार राऊत यांनीही भुजबळांच्या प्रवेशावर सावध पवित्रा घेतला आहे.

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर बुधवारी (दि.4) तालुकानिहाय इच्छूक व पदाधिकार्‍यांशी संवाद साधत खासदार राऊत यांनी जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. आमच्या इच्छुकांपैकी कोणालाही उमेदवारी द्या; मात्र, भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देऊ नका! अशी आग्रही मागणी येथील इच्छूकांनी केली. भुजबळ हे स्वत: शिवसेना प्रवेशाविषयी वावड्या उठवत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विचलीत झाले असून या इच्छूकांनी बुधवारी भुजबळ नकोचा नारा दिला. त्यामुळे बैठकीच्या केंद्रस्थानी भुजबळांचा शिवसेना प्रवेश हाच विषय होता.

- Advertisement -

मुलाखतींदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशाच्या गंभीर आर्थिक परिस्थितीला भाजपच करणीभूत असल्याचे सांगितले. केंद्रात महत्वाच्या चारही मंत्री हे भाजप सरकारचे आहे. कॉंग्रेसच्या काळात देखील अशी आर्थिक मंदीची परिस्थिति आली होती मात्र तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी उपाययोजना वापरत देशाला त्या परिस्थितीतून बाहेर काढले होते. भुजबळांबद्दल बोलताना ते म्हणाले की, भुजबळांनी मी जिथे आहे तिथे खुश आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे मी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आम्ही इतर पक्षातीळ नेत्यांना प्रवेश देताना रिठा वापरतो त्यामुळे नॅच्युरली ते साफ होऊन येतात अशी कोटी ही त्यांनी केली.

मुलाखतीपूर्वी येवला विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार कल्याणराव पाटील, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष संभाजी पवार, पंचायत समितीचे उपसभापती रूपचंद भागवत, तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, रतन बोरणारे, निवृत्ती जगताप, भास्कर कोढरे, शरद लहरे या शिष्टमंडळाने खासदार राऊत यांची भेट घेतली.

- Advertisement -

भुजबळांवर टिकास्त्र

भुजबळ व त्यांचे समर्थक मतदारसंघात शिवसेना प्रवेश करणार असल्याचा वावड्या उठवत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असला तरी, भुजबळांच्या विरोधात गुरुवार (दि.5) पासून जनजागृती मोहिम सुरु केली आहे. गावा-गावात जावून आम्ही भुजबळांच्या विरोधात प्रचार मोहिम राबवणार आहोत. – माजी आमदार कल्याणराव पाटील

निवडणुक आली की मांजरपाडा आठवते

गेल्या 15 वर्षात भुजबळांनी मतदारसंघात एकही काम केले नाही. निवडणुक आली की, मांजरपाड्याच्या प्रकल्पावर जावून बसतात. येथील पाणी येवल्यात कधी पोहोचणार आहे त्यांनाच माहित. त्यामुळे पाण्याचे गाजर दाखविले जाते. -तालुकाप्रमुख प्रकाश पाटील

भुजबळांविषयी उद्धव ठाकरे निर्णय घेणार

भुजबळांच्या प्रवेशाचा कोणताही विषय झालेला नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे याविषयी निर्णय घेणार असले तरी त्यांनी आम्हीला विचलीत न होण्याचे आश्वासन दिले आहे. -मजूर संघाचे अध्यक्ष संभाजी पवार

भुजबळांना पाडणार

यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भुजबळांना पाडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा येथे आमदार होणार असून आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी, आम्ही पक्षनिष्ठा राखून त्या उमेदवाराला निवडून आणणार आहोत. पण, भुजबळ सोडून.  – माजी उपसभापती रुपचंद भागवत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -