घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंपकरी हजर न झाल्यास ‘जिल्हा रुग्णालय' कारवाईच्या तयारीत

संपकरी हजर न झाल्यास ‘जिल्हा रुग्णालय’ कारवाईच्या तयारीत

Subscribe

नाशिक : कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याबाबत नोटीस देणार आहेत. कामावर हजर न झाल्यास आंदोलनात सहभागी कर्मचार्‍यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्‍या प्रसूतीसह इतर गंभीर आजारांच्या रुग्णांवर आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व घोटी येथील एसएमबीटी हॉप्सिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून दोन्ही रुग्णालयांना पत्रव्यवहार केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील ८९१ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या तिसर्‍या दिवशी बुधवारी (दि.१५) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय कामकाज कंत्राटी कर्मचार्‍यांना करावे लागले. जिल्हा रुग्णालयात ९२३ कंत्राटी कर्मचार्‍यांना ८ तासांऐवजी १२ तास कामकाज करावे लागत आहे. यात २६२ डॉक्टर, ६६१ कर्मचारी व ३८९ कंत्राटी परिचारिका आहेत. दोन दिवसांत १३४ जणांवर गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत १२ हून अधिक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ओपीडीमध्ये कर्मचारी नसल्याने रुग्णांचे हाल झाले.

शासकीय कर्मचार्‍यांनी गुरुवारी काढलेल्या महारॅलीत जिल्हा रुग्णालयातील संपावरील कर्मचारी सहभागी झाले होते. संपामध्ये जिल्हा नर्सेस असोसिएशनही सहभागी झाली होती. कंत्राटी कर्मचार्‍यांच्या भरवशावर जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा सुरू होती. कायम कर्मचारी संपात सहभागी झाल्याने रुग्णसेवेची भिस्त एनआरएचएम अंतर्गत नेमलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. शिवाय नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचीही रुग्णसेवेसाठी मदत घेण्यात येत आहे. कर्मचारी संप नियमितपणे सुरू राहील. कर्मचार्‍यांनी नोटीसला किंवा दबावाला बळी पडू नये, संप पेन्शन मिळेपर्यंत नियमित सुरू राहील, असे मेसेज संपकरी कर्मचार्‍यांनी एकमेकांना मोबाईलवरुन पाठवले.

- Advertisement -
१० महिन्यांच्या मुलाला घरी ठेवून करतेय जादा ड्युटी

बेमुदत संपामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांना जिल्हा रुग्णालयात १२ तास कामकाज करावे लागत आहे. संपामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. घरी १० महिन्यांचा मुलगा नातेवाईकांकडे ठेवून कंत्राटी महिला कर्मचार्‍यास कामावर यावे लागत आहे. आठ तासांची ड्युटी संपामुळे १२ तासांची झाली आहे. शिवाय, घरी पोहोचण्यास १ तास लागतो. त्यामुळे मुलाला वेळच देता येत नाही. संप लवकर मिटायला हवा, अशी व्यथा कंत्राटी महिला कर्मचार्‍याने मांडली.

ओपीडीतील रुग्णसंख्या घटली

जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दिवसभरात दीड हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, संपामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी होवू लागली आहे. गुरुवारी (दि.१६) दिवसभरात अवघे ५० टक्के रुग्ण ओपीडीमध्ये आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -