लॉकडाऊनमध्ये सव्वाचार लाखांची गावठी दारू जप्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले असतानाही बेकायदा मद्य वाहतूक व विक्री सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.  राहूरी (विंचूर – दळवी, ता.जि.नाशिक) येथे सोमवारी (दि.६) मद्याची वाहतूक करणाऱ्यास पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमो कारसह सव्वाचार लाखाची दारू जप्त केली आहे. संतोष पुंडलिक भागवत (४४, रा. राहुरी पो.विंचुर दळवी, ता.जि.नाशिक) असे अटक केलेल्या संशयित सुमोचालकाचे नाव आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आले आहे. या काळात मद्यसाठा वाहतूक व विक्रीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे तळीरामांची मागणी वाढली आहे. त्यासाठी ते वाटेल ती किंमत दयायला तयार असल्याने मद्यविक्रेत्यांनी बेकायदा पुढाकार घेतला आहे. भगूर पांढुर्ली मार्गावरून मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती विभागीय पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाचे निरीक्षक आर.एम.फुलझळके यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.६) भगूर पांढुर्ली रोडवरील रूख्मीनी विश्व मंगल कार्यालयाजवळ वाहन तपासणी केली असता गावठी दारूने भरलेली टाटासुमो (एमएच ०१ एएच ७४११) पथकाच्या हाती लागली. चालकास ताब्यात घेत पथकाने वाहनतपासणी केली असता सुमोत प्लॅस्टीकच्या कॅनमध्ये सुमारे २५० लिटर दारू मिळून आली.संशयीत विक्रीच्या उद्देशाने मद्याची वाहतूक करीत होता. पथकाने मद्यासह दारू असा सुमारे सव्वाचार लाखाचा ऐवज जप्त केला.