Impact : टवाळखोर मद्यपींवर अंबड पोलिसांची कारवाई

ambad police

नवीन नाशिक : अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघड्यावर दारू पिऊन उपद्रव करणार्‍या दहा जणांना रंगेहात पकडत त्यांच्याविरोधात कारवाई केली. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जलशुद्धीकरण केंद्रालगत नम्रता पेट्रोलियम समोर अवैधरित्या मद्यपान केले जात असल्याची बातमी दै.आपलं महानगरने प्रसिद्ध केली होती.

या बातमीची दखल घेत अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने, याठिकाणी काही व्यक्ती मद्यपान करून उपद्रव माजवत असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करत दहा जणांना मद्यपान करताना रंगेहात अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त परिमंडळ २ चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबड विभाग सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक संदीप पवार, अंमलदार रवींद्र पानसरे, किरण गायकवाड, जनार्दन ढाकणे ,दीपक जगताप अनिल ढेरंगे, संदीप भुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढे अशीच कारवाई सुरू राहणार असून सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून कोणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात तडीपारीची कारवाई करण्याचा सज्जड इशारा अंबड पोलिसांनी दिला आहे.

काय होते प्रकरण?

त्रिमूर्ती चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर मद्यविक्रीची दुकाने आहेत. या भागात नेहमीच मद्यपींचा गोंधळ, शिवीगाळ, हाणामार्‍या, होत असतात. मात्र पोलिसांकडून फारशी कडक कारवाई होत नसल्याने त्रिमूर्ती चौक मद्यपींचा अड्डा बनला आहे. सोमवारी (दि.६) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मद्यपींमध्ये सिनेस्टाईल हाणामारी व त्यांची दहशत पाहायला मिळाली. यावेळी मद्यपींकडून रस्त्याने जाणार्‍या दुचाकी अडवत वाहनचालकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली जात होती. त्यामुळे भीतीपोटी वाहन चालकांवर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निवडण्याची वेळ आली. दरम्यान, मद्यपींनी एका तरुणाला रस्त्यावर पाडून त्याच्या अंगावरील शर्ट फाडत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पीडित तरुणाच्या ओरडण्याने परिसरात भीती पसरली होती. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र, भीतीमुळे कोणीही मद्यपी तरुणांना अडवले नाही. त्रिमूर्ती चौक परिसर मदयपींचा अड्डा बनल्याने या परिसरात नेहमीच हाणामारीचे प्रकार घडत असतात. त्यामुळे नागरिकांना आपला रस्ता बदलवून जावे लागत होते.