Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक अवघ्या आठ दिवसांत आढळले तब्बल १८० म्युकरमायकोसिसचे रुग्ण

अवघ्या आठ दिवसांत आढळले तब्बल १८० म्युकरमायकोसिसचे रुग्ण

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली, मात्र पोस्ट कोविड आजार बळावल्याने वाढतेय चिंता

Related Story

- Advertisement -

कोरोनाबाधितांच्या तुलनेत म्युकरमायकोसिस आजाराने पिडीत रुग्णांची संख्या ही वरवर कमी दिसत असली तरीही, मृत्यूदर तब्बल साडेआठ टक्क्यांवर असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मे महिन्यात २८८ रुग्ण आढळून आले असताना आता मात्र, जूनच्या आठवडाभरात म्युकरमायकोसिसचे तब्बल १८० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

गेल्या दोन महिन्यांत कोरोना संसर्गाने शहरासह जिल्हाभरात थैमान घातले होते. हा धोका कमी होताच आता कोरोनापश्चात होणार्‍या आजारांचे संकट प्रशासनासह आरोग्य विभागापुढे उभे ठाकले आहे. या आजारांमध्ये म्युकरमायकोसिस संसर्गाचे प्रमाणही वाढत असल्याने, या आजाराच्या उपचारांत वापरले जाणारे प्रमुख बुरशीनाशक अ‍ॅम्फोटेरेसिन हे इंजेक्शन्सचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राजकीय स्तरावरुनही तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत २२१, जिल्ह्यात ७0, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात १ असे २९६ रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १६, मालेगावातील सरकारी रुग्णालयात २, इगतपुरीच्या एमएमबीटी रुग्णालयात ५२ आणि अन्य खासगी रुग्णालयांमध्ये तब्बल २२६ रुग्ण उपचार घेत आहेत. यातल्या प्रत्येक रुग्णाला दिवसाकाठी किमान ५ अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन्सची गरज असते. मात्र, वारंवार ओरड होऊनही अद्याप अनेक रुग्णांना एकही इंजेक्शन मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्याचा थेट परिणाम हा रुग्णांच्या उपचारावर होतो आहे. सरकारी पातळीवरून या इंजेक्शन्सचे वितरण होत असल्याने ते प्राधान्याने सरकारी रुग्णालयांमध्ये वितरित होते, त्यानंतर खासगी रुग्णालयांचा विचार होतो. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये जीवनदायी योजना लागू असल्याने आर्थिक दुर्बल रुग्ण त्या ठिकाणी दाखल होतात. असे असताना वितरणातील दुजाभाव का, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जातो आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची सद्यस्थिती

  •  अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : 296
  • बरे झालेले : 131
  • मृत्यू : 41
  • महापालिका क्षेत्रात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : 221
  • जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : 75
  • मालेगाव पालिका क्षेत्र : 01

प्रबोधनाकडे दुर्लक्ष

कोरोना संसर्गाबाबत जेवढ्या व्यापक प्रमाणात प्रबोधनासाठी प्रयत्न केले गेले, तेवढे प्रयत्न म्युकरमायकोसिस आजाराच्या माहितीसाठी होत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः ग्रामीण भागांत म्युकरमायकोसिसची लक्षणे, कारणे, उपचार याबाबत माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. तसे झाले तर उपचारांतील विलंबामुळे होणारे मृत्यू कमी होतील. अनेक रुग्ण नेहमीचे साधे दुखणे म्हणून याकडे दुर्लक्ष करतात आणि यातून बुरशी वेगाने वाढत एक-एक अवयव निकाम करत असते. त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार महत्त्वाचे ठरतात.

Dr. Nagargoje NMCम्युकर मायकोसिस हा पोस्ट कोविड अर्थात कोविड संसर्ग झाल्यानंतर होणारा आजार आहे. त्यामुळे हे रुग्ण वाढताना दिसत आहेत. वेळेत निदान आणि उपचार केल्यास रुग्ण लवकर बरे होतात. त्यामुळे लक्षणे दिसताच रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
             – डॉ. बापूसाहेब नागरगोजे,वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका

- Advertisement -

- Advertisement -