पहिल्याच आठवड्यात अवकाळी

८ ते ११ जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता;हवामान खात्याचा अंदाज

नाशिक : मागील वर्षभरात अधूनमधून रिपरिप सुरु ठेवणार्‍या पावसाने नवीन वर्षातही तेच सत्र सुरु ठेवले आहे. नव्या वर्षांच्या पहिल्याच आठवड्यातच पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. या पावसाने शहरात गारवा निर्माण झाला आहे.

हवामानातील या बदलाला अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून वायव्य आणि लगतच्या मध्य भारतामध्ये येणार्‍या उच्च पातळीची आर्द्रता कारणीभूत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेनंतर शहरात रिमझिम पावसाला सुरूवात झाली.

हवामान खात्याने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार ८ ते ११ जानेवारीदरम्यान अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.