आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘कुलगुरू का कट्टा’

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झाला उपक्रम

नाशिक : शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणार्‍या शैक्षणिक समस्या, अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण होण्यासाठी प्रत्यक्ष संवाद होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी ‘कुलगुरू का कट्टा’ उपक्रमांर्तगत ऑनलाईन मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे उपस्थित होते.

विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू असल्याने या उपक्रमास विद्यार्थ्यांनी होस्टेलमधील अडचणी, स्वच्छतागृहे याबद्दलच्या तक्रारी मांडल्या. त्याबद्दल महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना कळवण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठातर्फे ऑनलाईन लायब्ररी सुरू करण्यात आली असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे कानिटकर यांनी सांगितले.

विद्यापीठातर्फे विद्यार्थी कल्याणकारी विविध योजना राबवण्यात येत असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे मत, सूचना व तक्रारींमधून महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहेत. त्यानुसार कार्यपद्धतीत सुधारणा करणे शक्य होईल तसेच विद्यापीठाकडून निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात कुलसचिव चव्हाण यांनी सांगितले की, ‘कुलगुरू का कट्टा’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद शक्य आहे. कुलगुरूनी ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये नमूद केलेल्या या उपक्रमाला संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी आभार मानले.