‘एक झाड-एक परिवार’ संकल्पना राबवा, केंद्रीय मंत्री गडकरींचे नाशिककरांना आवाहन

थीम पार्क लोकार्पण सोहळा मंत्री गडकरींच्या हस्ते

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी भारतीय वाद्यातील मंजूळ स्वरातील वाहनांचे हॉर्न बनवण्याचा कायदा केला असून, यामुळे ध्वनीप्रदूषण रोखण्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक या संकल्पनेतून ‘एक झाड-एक परिवार’ ही योजना राबवून देशात नंबर एक येण्यासाठी नाशिककरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधील साईनगर परिसरात नाशिक महापालिका आणि अमृत योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पाच एकर जागेवर अद्ययावत श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय थीम पार्कच्या लोकार्पण झाले. या सोहळ्याप्रसंगी रविवारी (दि.3) ते बोलत होते.

यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, नाशिकला पवित्र गोदावरीचा स्पर्श झालेला आहे. याच साधुसंतांच्या भुमीत सांस्कृतिक, धार्मिक व तत्वज्ञानाचे साहित्य आपल्याला जगण्याची प्रेरणा देत असतात. संपूर्ण देशात नाशिकचे नाव अग्रेसर राहील. पर्यावरणाच्या दृष्टीने ध्वनी, वायू व जलप्रदुषण टाळून व नियमित प्राणायाम, योगा व व्यायाम केल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. वाहनांवरील होणार्‍या कर्णकर्कश्य हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदुषण होत असते ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतिश कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, सुरेश पाटील, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, स्थायी समिती सभापती गणेश गिते, मनपा भाजपा गटनेते अरुण पवार, सभागृह नेता कमलेश बोडके, प्रभाग समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेविका प्रियंका माने, रुची कुंभारकर, पूनम मोगरे, चंद्रशेखर पंचाक्षरी आदी उपस्थित होते.

भाजपा पदाधिकारी आणि नगरसेविका प्रियंका माने यांचे पती धनंजय माने यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत बॅटरीच्या वाहनातून संपुर्ण थीम पार्कची पाहणी करत सोयीसुविधांबाबत माहिती दिली. थीम पार्ककडे जाणार्‍या रस्त्यांची दुरवस्था यावेळी दिसून आली. त्यामुळे गडकरी यांच्या वाहनांचा ताफा चांगल्या रस्त्याने आणण्याची काळजीही घेण्यात आली.