घरमहाराष्ट्रनाशिकअंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

Subscribe

स्थायी समितीच्या बैठकीतील निर्णय; दिनकर पाटील यांनी मांडला प्रस्ताव

महापालिकेच्या अखत्यारितील अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी माजी सभागृहनेता तथा नगरसेवक दिनकर पाटील यांनी स्थायी समितीला पत्र देऊन केली. या पत्रावर सकारात्मक निर्णय घेत नियमानुसार वाढ करण्याचा आदेश सभापती उध्दव निमसे यांनी जाहीर केला.

स्थायी समितीच्या नुुकत्याच झालेल्या सभेत पाटील यांच्या पत्राचे वाचन करण्यात आले. यात म्हटले होते की, महापालिका महिला व बाल कल्याण विभागांतर्गत महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी अंगणवाड्या १९९४ पासून सुरु करण्यात आलेल्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये मुख्य सेविका, सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या व आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील महिला असून मुख्य सेविका व मदतनीस यांना सद्यस्थितीत महापालिकेमार्फत दिले जाणारे मानधन अत्यंत अल्प आहे. आजच्या महागाईच्या युगात मुख्य सेविकांना ५५०० रुपये, सेविकांना ४६०० रुपये व मदतनीसांना ४ हजार रुपये प्रती महिन्याप्रमाणे अल्प मानधनामध्ये कुटूंबाची उपजिविका करणे जीकरीचे होत आहे. परंतु जिल्हा परिषदेंतर्गत एकात्मीक बाल विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणार्‍या अंगणवाडी सेविकांसाठी आठ हजार प्रती महिना मानधन अदा केले जाते. ही बाब महापालिकेच्या मुख्य सेविका, सेविका व मदतनीस यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच मुख्य सेविका, सेविका व मदतनीस यांच्याकडून जनगणना आर्थिक गणना, पल्स पोलिओ डोस, मतदार नोंदणी अभियान, आरोग्य अभियान व जंत नाशक गोळ्यांचे वाटप असे अनेक राष्ट्रीय कामे करुन घेण्यात येतात. त्यांच्या अतिकालीन कामाचे वेतन अदा केले जात नाही.

या होत्या प्रमुख मागण्या-

  •  महापालिका अंगणवाडी मुख्य सेविकांना शासनाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे वेतन व अन्य भत्ते देणे
  • महापालिका सेविका यांना दहा हजार रुपये व मदतनीस यांना ८ हजार रुपये प्रती महिन्याप्रमाणे मानधन देणे
  • मुख्य सेविका, सेविका व मदतनीस यांना गेल्या वर्षापासून मानधन देण्यात आलेले नाही. तरी हे वर्षभराचे मानधन तत्काळ अदा करने.
  • मुख्य सेविका, सेविका व मदतनीस यांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करणे.
  • शासनाच्या सन २०११ च्या निर्णयानुसार २००६ ऐवजी २०११ पासून भविष्य निर्वाह निधी व अन्य मुद्यांची अमलबजावणी
  • विहित वयोमानानुसार ६५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर मुख्य सेविका, सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीच्या दिवशी सत्कार सोहळा घेणे.
  • सेवानिवृत्तीच्या नंतर पेन्शन लागू करणे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -