Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक महापालिकेकडून पाणी कपातीचे संकेत; पालकमंत्री मात्र अनभिज्ञ

महापालिकेकडून पाणी कपातीचे संकेत; पालकमंत्री मात्र अनभिज्ञ

Subscribe

नाशिक : महापालिकेने जून महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव सादर केला असून, पालिकेने तसा निर्णयही घेतला आहे. मात्र, पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शवली असून, जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर काळजी करण्यासारखी परिस्थिती सध्यातरी नाही. त्यामुळे तूर्तास पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. हवामानाचा अंदाज घेऊनच जुलै, ऑगस्ट महिन्यात गरज भासल्यास तसा निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

हवामान तज्ज्ञांनी अल निनो वादळामुळे जून ते ऑगस्टदरम्यान पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविली आहे. शासनाच्या निर्देशांनुसार जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेने जून, जुलै महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, यावर निर्णय होऊ शकला नाही. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी जून महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता असा कोणताही निर्णय बैठकीत घेतला गेला नसल्याचे सांगत याविषयी अनभिज्ञता दर्शवली. जून, जुलै महिन्यात पावसाचा अंदाज घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्ह्याच्या ज्या भागातील पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावीत. जेणेकरून संभाव्य पाणीटंचाई काळात त्या पाणी पुरवठा योजनांचा नागरिकांना उपयोग होईल. तसेच, गावपातळीवरील नादुरूस्त विंधन विहिरींच्या दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. पाण्याचा वापर जपून करावा, तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये आजमितीस सुमारे ४१ टक्के पाणीसाठा आहे. अल निनोचा धोका लक्षात घेता यंत्रणेने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. विशेषतः ग्रामीण भागातील जलस्त्रोत विचारात घेऊन गावांची लोकसंख्या, आवश्यक पाणीसाठा, टँकरची संख्या, टँकरच्या फेर्‍यांचे नियोजन करावे. तसेच, जलस्त्रोतांचे मॅपिंग करून आराखडा तयार करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले. २०१५ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात ३५० टँकर सुरू करण्यात आले होते. संभाव्य धोका लक्षात घेता चारशे ते साडेचारशे टँकरचे नियोजन करावे लागण्याची शक्यता या बैठकीत वर्तविण्यात आली.

- Advertisement -

ग्रामीण भागातील गावनिहाय आराखडा तयार करून गुरूवारी हा आराखडा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभागांना दिले. ज्या भागातील पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत ती कामे तातडीने पूर्ण करावीत. जेणेकरून संभाव्य पाणीटंचाई काळात त्या पाणीपुरवठा योजनांचा नागरिकांना उपयोग होईल. तसेच, गावपातळीवरील नादुरूस्त विंधन विहिरींच्या दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. पिण्याच्या पाण्याचा अपव्यव होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.

- Advertisment -