इंडिगोची गोवा, नागपूर, अहमदाबादसाठी सेवा सुरू; पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ प्रवाश्यांचे उड्डाण

नाशिक : इंडिगो कंपनीने बुधवारपासून (दि.16) विमानसेवेला प्रारंभ केला. पहिल्या टप्प्यात नागपूर, गोवा आणि अहमदाबाद शहरांसाठी कंपनीने सेवा सुरू केली. सेवेच्या पहिल्याच दिवशी नाशिकहून या तीन शहरांसाठी १८० प्रवाशांनी प्रवास केला. तर, या तीन शहरांतून १८६ प्रवासी नाशिकला आले.

ओझर येथून विमानसेवेचा विस्तार होत असल्याने नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे. यापूर्वी तीन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात होती. स्पाईस जेट वगळता इतर कंपन्यांनी नोव्हेंबरपासून सेवा अचानक बंद केली. त्यामुळे स्पाईसजेटकडून दिल्ली व हैदराबाद या दोन शहरांसाठीच सध्या सेवा सुरू आहे. नाशिकमधून विमानसेवेचा विस्तार व्हावा याकरिता उद्योजकांकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार इंडिगो कंपनीने नाशिकमधून सेवा सुरू करण्याचे निश्चित केले. गेल्या महिन्यात ओझर विमानतळाला भेट देऊन प्रवासी सुविधांची पाहणी केली. कंपनीने जवळपास ५० कर्मचार्‍यांची नियुक्ती केली. गोवा, अहमदाबाद व नागपूर येथून कनेक्टिंग विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी नाशिकहून गोव्यासाठी ६१ प्रवाशांनी प्रवास केला तर गोव्याहून ५५ प्रवासी नाशिकला आले. नाशिकहून अहमदाबादसाठी ६६ प्रवाशांनी प्रवास केला तर, अहमदाबादहून ६६ प्रवासी नाशिकला आले.

५३ प्रवाशांनी नाशिकहून नागपूर गाठले तर, ६५ प्रवाशी नागपुरहून नाशिकला आले. पहिल्याच दिवशी विमानसेवेला नाशिकसह इतर शहरांमधून चांगला प्रतिसाद लाभला. दरम्यान, या तीनही सेवांदरम्यान प्रवाशांचे कंपनीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.