घरमहाराष्ट्रनाशिकउद्योग, ज्ञान आरोग्य संपदाची खाण "शुक्ल गल्ली"

उद्योग, ज्ञान आरोग्य संपदाची खाण “शुक्ल गल्ली”

Subscribe

दहीपूल ते चांदवडकर लेन हा रस्ता पूर्वी अस्तित्वात नव्हता. कमला विजय व समोरील सुगंधी यांच्या शेजारील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ संपत असे आणि चांदवडकर यांच्या वाड्याकडे मेनरोडकडे जाणारा रस्ता भागवत तबेला ओकाची तालीम मागील शुक्ल गल्लीतून चांदवडकर यांच्या भिकुसा कारखान्याजवळ मिळत असे. दुसरा मार्ग म्हणजे खाडिलकर वाडा, यांचे निवासासमोर ! भागवत तबेला रस्ता, सिन्नरचे भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या भिकुसा विडी कारखान्याची १९२० मध्ये निघाली.

सिन्नर गावात विणकर्‍यांचा व्यवसाय असलेल्या परिवारातील क्षत्रिय यांच्या चिरंजीवांनी भिकुसा कारखान्यातून विडी व्यवसायास सुरूवात केली आणि सुपात तंबाखू व तेंदूच्या पानांच्या विडया वाळून व्यवसायाला प्रारंभ केला. आपल्या अविश्रांत व अथक प्रयत्नांद्वारे तेंदूच्या पानांच्या विशाल वटवृक्षात रूपांतर केले आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर, धुळे, सांगली त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश, कर्नाटक प्रांतात व्यवसाय वाढविला. बंधू लहानुसा, चिमनसा व रावजीसा यांची सक्रिय साथ त्यांना मिळाली. इतकेच काय तर आफ्रिकेपर्यंत त्यांनी सिन्नर विडीला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि नाशिक येथे भिकुसा प्रेस यांनी भागवत तबेला गल्लीत सुरू केली व शुक्ल गल्लीतदेखील दुसरा कारखाना काढला. सहा हजार विडी कामगार दोन हजार व्यवस्थापन कर्मचारी कामाला होते.

- Advertisement -

महाराष्ट्रातील अनेक
शाखांद्वारे एक प्रकारे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत हजारो श्रमजीवी कामगारांना रोजी रोटी उपलब्ध करून देऊन टाटा, बिर्ला प्रमाणे अंशत: का होईना सिन्नरचे, पर्यायाने नाशिकचे नाव उद्योग क्षेत्रात कीर्तिवंत केले म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भागवत तबेला गल्ली, भिकुसा लेन या नावाने ओळखली जाऊ लागली. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयांना त्यांनी देणग्या दिल्या. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर उद्योग, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात नाशिकची चौफेर प्रगती झाली. त्यात भिकुसा यमासा. बस्तीरामशेठ सारडा, रामनाथशेठ चांडक, वाजे या व्यावसायिकांचे महत्त्वाचे योगदान आहे. इतिहास लेखनाच्या वाटचालीत या मान्यवरांच्या कर्तृत्वाची व औदार्याची नोंद देणार आहोतच.

व्यवसायाचा वाढता व्याप सांभाळण्यासाठी क्षत्रिय बंधूंनी आपल्या व्यवसायाची वाटणी केली तीत भिकुसा विडीचे लोकप्रियतेत रावजीसा यमासा क्षत्रिय यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षकी पेशाकडे असलेले रावजीसा शेठ या बिरूदावलीऐवजी रावजीसा मास्तर या आदरयुक्त नावानेच नाशिककर त्यांचा उल्लेख करीत असत. भिकुसा गल्लीतील निवासस्थानी व कारखान्यात संत शिरोमणी, संत गाडगे महाराज यांनी भेट देऊन दिलेले आशीर्वाद आणि शुक्ल गल्लीतील कारखान्यात बालगंधर्व व जोहराबाई यांचा सत्कार व त्यांची अखेरच्या पर्वातील मैफल मास्तरसाहेबांनी घडवून आणली. वृध्दावस्थेतील व्याधींनी बेजार झालेल्या बालगंधर्वांचे गाणे म्हणजे निमित्त व देवा केवळ तुमचे दर्शन व माझ्या वास्तूला तुमचा चरणस्पर्श यासाठी सत्काराचा अट्टहास या कृतज्ञ जाणिवेने झालेली ही आगळीवेगळी संस्मरणीय मैफल अनेक समकालीन संगीत प्रेमी सृजनांच्या मनात चिरंतन घर करून वसलेली आहे.

- Advertisement -

पेशवेकाळात श्रीमंतांच्या वाड्याशेजारी वास्तव्यास असलेली मुख्यत्वे ब्रह्मवृंदांची वस्ती. वैद्य, लवाटेशास्त्री, नांदुर्डीकरांचे आनंदीवाडा, भानोसे गायधनी ख्यातकीर्त गटणे वकीलांचा वाडा ही प्रसिध्द घराणी! तत्कालीन वैभवशाली परिवार म्हणजे शुक्ल व गर्गे हा परिवार! पेशव्यांचे मामा कर्पे यांनी त्यांचे उपाध्ये असलेले सखारामशास्त्री गर्गे यांना दिला. या वाड्यात नाशिकच्या धार्मिक परंपरेत भर घालणारी १३ वी पाठशाळा सुरू करावी अशा हेतूने प्रेरित होऊन गर्गेशास्त्री यांना विकला होता. मोरेश्वरशास्त्री व गणपती एकनाथशास्त्री गर्गे यांच्या पाच पिढ्यांनी धार्मिक परंपरा उजळविली व वर्धिष्णु केली. त्याची वैभवपताका कन्याकुमारी ते चेन्नई या देशपातळीवर आणि अमेरिकेत परदेशांतही यज्ञयागामध्ये होऊन नाशिकची विद्वत्ता सिध्द केली. श्यामराव गर्गे, भय्याशास्त्री गर्गे, घनपाठी राजारामशास्त्री गर्गे यांनी या घराण्याच्या श्रेष्ठत्त्वाचा परिचय संपूर्ण महाराष्ट्रात करून दिला.

विशेषत: मोरेश्वर श्रीकृष्ण गर्गे सांगलीचे श्रीमंत राजे पटवर्धनांच्या राजदरबारात राजज्योतिषी म्हणून दरबाराचे मानकरी ठरले. दाते पंचागाप्रमाणे सांगलीकडे गर्गेशास्त्री यांच्या नाशिकच्या पंचांगाला प्राधान्य होते. मोरेश्वरशास्त्री यांचे सुपुत्र नारायण गर्गे हे वेदशास्त्र संपन्न म्हणून प्रसिध्द होते. नाशिककरांना सर्व परिचित असलेले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते अनिल गर्गे हे व्यक्तिमत्त्व याच गर्गे परिवाराचा लौकिक सांभाळून आहेत. नाशिकमध्ये प्रारंभीच्या काळात असलेली साधना टायपिंग क्लासेस व जाहिरात क्षेत्रातील प्रतिभा अँड एजन्सी या ख्यातकीर्त संस्थेचे माधवराव गर्गे यांनी पळनीटकर यांच्या सहाय्याने सुरू केलेली जाहिरात एजन्सीचा लौकिक महाराष्ट्रात पसरविला होता. महाराष्ट्राचे वेदशास्त्र पठण विनामूल्य देणारी पाठशाळा असा गर्गे परिवाराचा नावलौकिक आहे. राजकीय घडामोडीत जॅक्सन खटल्यातील चंद्रात्रे, लिमये यांना आप्पाजी गर्गे यांनी आश्रय दिला होता. या गर्गे परिवाराचे वास्तव्य याच शुक्ल गल्लीत आहे.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -