घरताज्या घडामोडीभूमिकेत बदल : साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय व्यक्तींना मान

भूमिकेत बदल : साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय व्यक्तींना मान

Subscribe

आयोजक म्हणतात, महामंडळानेच केली निमंत्रणपत्रिका अंतिम

नाशिक – शहरात होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व समारोपाला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याने संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीचा मुद्दा नव्याने चर्चेला आला आहे. शिवाय, साहित्य वर्तुळात नाराजी पसरली आहे. उस्मानाबाद येथील ९३ व्या साहित्य संमेलनात राजकीय व्यक्तींना संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे उस्मानाबाद आणि नाशिकच्या संमेलनात दुजाभाव केला जात आहे का, असा प्रश्न साहित्य वर्तुळातून उपस्थित होत आहे. साहित्य महामंडळानेच निमंत्रणपत्रिका अंतिम केली असून, त्यामुळे पत्रिकेत कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती दस्तुरखुद्द संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी लोकांना प्रवेश असू नये, अशी चर्चा प्रत्येक संंमेलनादरम्यान केली जात आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाच्या कार्यक्रमात भूमिका असल्याशिवाय राजकीय व्यक्तींना व्यासपीठावर प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद छगन भुजबळ यांच्याकडे गेले. पण ते स्वागताध्यक्ष या नात्याने व्यासपीठ भूषवू शकतात, असेही सांगण्यात आले. उस्मानाबाद येथे झालेल्या ९३ व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी राजकीय मंडळी व्यासपीठासमोरील पहिल्या रांगेत बसली होती.

- Advertisement -

१९९६ मध्ये आळंदीला ६९ वे साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह शरद पवार, गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख व्यासपीठासमोर खाली पहिल्या रांगेत बसले होते. मात्र, नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व समारोपास विशेष पाहुणे म्हणून खासदार शरद पवार यांना व्यासपीठावर स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे साहित्य वर्तुळात नाराजी पसरली आहे. नाशिकच्या संमेलात साहित्य महामंडळ भूमिका का बदलत आहे, असा प्रश्नही साहित्य वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

साहित्य महामंडळाकडून दुजाभाव

उस्मानाबाद येथील ९३ व्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना बसता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तर नाशिक येथे होणार्‍या साहित्य संंमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान दिले जाणार नाही असे सांगितले जात असतानाही निमंत्रणपत्रिकेत राजकीय व्यक्तींना प्रमुख पाहुणे व विशेष पाहुणे म्हणून स्थान दिले आहे. त्यामुळे उस्मानाबादावर अन्याय केल्याची साहित्य वर्तुळात चर्चा सुरु आहे. संमेलनाच्या व्यासपीठावर कोण असावे, कोण नसावे याबाबत स्पष्टता नसल्याने साहित्य वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिकचे मराठी साहित्य संमेलन आधीच कोरोनामुळे वर्षभर स्थगित झाले होते. आता हे साहित्य संमेलन आहे त्या परिस्थितीत पार पाडायचेच आहे. – कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -