घरमहाराष्ट्रनाशिकआघाडीला ५० जागा जिंकणेही अवघड

आघाडीला ५० जागा जिंकणेही अवघड

Subscribe

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे भाकित

लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामी आल्याने भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. विरोधी पक्षनेतेच आता भाजपामध्ये आलेले आहेत. अनेक नेते येण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकच शिल्लक राहणार नाही, असा टोला लगावत यंदाच्या निवडणुकीत आघाडीला ५० जागाही जिंकता येणार नाहीत, असे भाकित जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठकीचे आयोजन शहरातील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, खासदार भारती पवार, महिला मोर्चा राष्ट्रीय चिटणीस पूजा मिश्रा, आमदार देवयानी फरांदे, आमदार कांता नलावडे, महापौर रंजना भानसी, नीता केळकर, उमा खापरे, महिला मोर्चा शहराध्यक्षा रोहिणी नायडू आदी मान्यवर उपस्थित होते. महाजन म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा येतील, असे कोणालाच वाटले नव्हते. यंदा मोदी लाट नाही, असे सांगितले जात होते. मात्र, मोदी सरकारच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत लोकांनी मोठ्या प्रमाणावर भाजपाला मतदान केल्याने पुन्हा एकदा विजय प्राप्त करता आला. देशात ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत, त्याच धर्तीवर पाच वर्षात केलेली विविध कामे, पारदर्शी कारभार, गेल्या ५०-६० वर्षापासून रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्नही मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदेशीर चौकटीत बसवत मार्गी लावला आहे. याचमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी बाकावर पहिल्या फळीत बसणारे नेते भाजपात प्रवेश करण्यासाठी धडपडत असल्याचा त्यांनी दावा केला.

- Advertisement -

लोकसभेला राहुल गांधी यांच्याविरोधातील जागा पक्षाने जिंकली. मात्र, बारामतीमध्ये थोडे कमी पडलो असलो तरी अनेक दिग्गजांना नेस्तनाबूत केल्याची कमाल केली. काँग्रेस नेत्याची तोंडे तीन दिशेला असल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधक ५० जागाही जिंकू शकणार नाहीत. राष्ट्रवादीतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. राष्ट्रवादीत पवार घराणेशाही राबवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. एकूणच स्थिती पाहता यंदा राज्यात विरोधकच शिल्लक राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या विजयासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे, राज्य शासनाने केलेली विविध कामे नागरिकांपर्यंत पोहोचवा, असेही आवाहन महाजन त्यांनी केले.

पाया पडण्याचे नेमके कारण काय?

आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप तसेच आमदार सीमा हिरे यांचा वाढदिवस असल्याने या बैठकीदरम्यान त्यांच्या पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही आमदारांची तिकीट कापले जाण्याची शक्यता तसेच शहराध्यक्ष बदलण्याची चर्चा यामुळे हिरे व सानप यांनी मंत्री महाजन यांचे पाय धरून नेमका कोणता आशीर्वाद घेतला, याचीच चर्चा महिला पदाधिकार्‍यांमध्ये रंगली होती. विशेष म्हणजे महाजन यांनीदेखील पाया पडण्याचे नेमक काय कारण, असा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात एकच हशा पिकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -