Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक जन्माष्टमी सोहळयानिमित्त इस्कॉन मंदिरात मांदियाळी; सलग 12 तास कीर्तन, 30 हजार लाडुंचे...

जन्माष्टमी सोहळयानिमित्त इस्कॉन मंदिरात मांदियाळी; सलग 12 तास कीर्तन, 30 हजार लाडुंचे वाटप

Subscribe

नाशिक : नाशिक शहरातील विविध मंदिरात जन्माष्टमीची तयारी करण्यात आली आहे. शहरातील इस्कॉन मंदिरात तीन दिवसांच्या जन्माष्टमी सोहळ्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी 12 तास हरिनाम कीर्तन आणि सुक्यामेव्याच्या 30 हजार लाडूंचे आणि बर्फीचे वाटप केले जाईल. सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात श्री कृष्ण जन्माष्टमीची तयारी करण्यात येत असून नाशिक शहरातील विविध मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील इस्कॉन मंदिरात तीन दिवसांच्या जन्माष्टमी सोहळ्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 12 तास कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सलग तीन दिवस कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. या तीन दिवसात तब्बल 30 हजार लाडूंचे आणि बर्फीचे वाटप केले जाणार आहे. गुरुवारी जन्माष्टमीनिमित्त पहाटे 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होतील. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म मुहूर्तावर महाआरती होईल. सोहळ्याची सांगता शुक्रवारी होणार असून नंद उत्सवानंतर 5 हजार भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे.

- Advertisement -

जन्माष्टमीनिमित्त मंदिराची तसेच श्री राधा-कृष्णांच्या विग्रहांची आकर्षक सजावट करण्यात येत आहे. तब्बल 15 प्रकारच्या फुलांनी मंदिरात विशेष सजावट करण्यात आली आहे. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात शहर तसेच जिल्हाभरातील हजारो भाविक सहभागी होणार आहेत. मंदिर तीनही दिवस दर्शनासाठी दिवसभर खुले राहिल. मंदिराबाहेर विविध धार्मिक ग्रंथांचे प्रदर्शन-विक्री तसेच विविध स्टॉलही लावण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे प्रमुख तसेच इतर भाविक परिश्रम घेत आहेत. नाशिककरांनी या तीन दिवसांच्या महोत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.

अशी आहे कार्यक्रमाची रुपरेषा

दरम्यान श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने 6 तारखेला मंदिरात 12 तास हरिनाम कीर्तनाचे आयोजन केलेले आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे 5 वाजता मंगल आरती, 6 वाजता हरे कृष्ण महामंत्र जप, सकाळी 8 वाजता श्रीमद भागवत प्रवचन असणार आहे. श्री श्री राधा मदनगोपाल विग्रहांना नवीन वस्त्र परिधान करण्यात येणार आहेत व नयनरम्य अशी वेदीची सजावट देखील करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजेपासून पुन्हा विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री 11 वाजता पंचामृत अभिषेक तर ठीक 12 वाजता कृष्ण जन्म मुहूर्तावर महाआरती केली जाईल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -