Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक पंचवटीसह जनशताब्दी रेल्वे २५ जूनपासून धावणार

पंचवटीसह जनशताब्दी रेल्वे २५ जूनपासून धावणार

या रेल्वे नियमित नव्हे तर कोविड स्पेशल म्हणूनच धावणार

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे बोर्डाने रद्द केलेल्या गाड्यांपेैकी मनमाड-मुंबई-मनमाड ही पंचवटी एक्सप्रेस आणि औरंगाबाद-मुंबई ही जनशताब्दी एक्सप्रेस शुक्रवारपासून (दि.२५) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दोन्हीही रेल्वे नियमित नव्हे तर कोविड स्पेशल म्हणूनच धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असल्याने रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या वतीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. कारण, कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर देशभरातील रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाला होता. त्यातच नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांची जीवनवाहिनी म्हणून गेल्या 41 वर्षांपासून सुरू असलेली पंचवटी एक्सप्रेस अनेक दिवसापासून बंद होती. यासह औरंगाबाद सीएसटी (मुंबई) ही एक्सप्रेसदेखील बंद होती. मात्र, या दोन्ही गाड्या येत्या 25 जूनपासुन विशेष दर्जा देत सुरू करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. दोन्हीही गाड्या आपल्या पूर्वीच्या वेळीच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

- Advertisement -

पंचवटी एक्स्प्रेसच्या चेअर कार डब्यात एकूण 234 सीट्स आहेत. तर, सेकंड क्लास डब्यात एकूण 1 हजार 534 सीट्स आहेत. गाडी सुरू झाली असली तरी पासधारकांनादेखील आरक्षण करूनच प्रवास करावा लागणार आहे. सध्या तरी मासिक पास चालणार नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.

या रेल्वे सुरू झाल्यानंतर नियमित प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, यात आरक्षणाची अट घालण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते आहे. रेल्वे प्रशासनाने नियमित पासधारक प्रवाशांचा आस्थेने विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी होते आहे.

अनेक दिवसांपासून नियमित रेल्वेसेवा बंद आहे. कोरोना संसर्ग कमी होत असल्याने रेल्वे प्रशासनाने हळूहळू गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार. मनमाड ते थेट मुंबईपर्यंत मनमाड ते नाशिक दरम्यान असलेल्या गावांतील चाकरमाने व विद्यार्थी रेल्वेने ये-जा करतात. त्यांच्यासाठी ही बाब आनंदाची आहे. मात्र, मासिक पासधारकांना परवानगी द्यावी. जेणेकरून आम्हा चाकरमान्यांना याचा फायदा होईल.
– धनंजय आव्हाड, मासिक पासधारक

- Advertisement -