सासू-सून, दीड वर्षाच्या मुलाला चिकटपट्टीने बांधून ठेवत दागिने, २ लाख रुपये लंपास

सातपूरमध्ये भरदिवसा दरोडा

दरोडेखोरांनी भरदिवसा सासू व सुनेला चिकटपट्टीने बांधून आणि दीड वर्षाच्या मुलासह महिलांना चाकूचा धाक दाखवत दागिने व दोन लंपास केल्याची घटना सातपूरमधील उद्योजक बाबूराव नागरगोजे यांच्या घरी सोमवारी (दि.७) सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. दरोडेखोरांना पकडण्यासाठी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या चार टीम आणि सातपूर पोलीस ठाण्याची एक टीम रवाना झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जाधव संकुल परिसरातील लाव्होटी मळ्यात उद्योजक बाबूराव नागरगोजे यांचा भगवान गड नावाचा बंगला आहे. ते सोमवारी सकाळी १०.१५ वाजेदरम्यान बंगल्याबाहेर गेले. त्यानंतर अनोळखी पाचजणांनी त्यांच्या बंगल्यात सकाळी ११ वाजेदरम्यान घरात घुसले प्रवेश केला. त्यांनी सासू, सुना व दीड वर्षांच्या मुलाला चिकटपट्टीने बांधून ठेवले. त्यांनतर त्यांना चाकूचा धाक दाखवत घरातील सुमारे ५० तोळे सोने आणि दोन लाख रुपये घेत पळून गेले. दरोड्याची माहिती मिळताच पोलीस पोलीस उपायुक्त विजय खरात, संजय बारकुंड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकास प्राचारण करण्यात आले होते.

मारु नका, काय न्यायचे ते न्या

नागरगोजे यांच्या घरात दरोडेखोरांनी सासू, सून आणि दीड वर्षाच्या मुलास चिकटपट्टीने बांधून ठेवल्यानंतर देवघरात बसवले. त्यांना पैसे कुठे आहेत, असे विचारत दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवला. त्यावेळी त्या भयभीत झाल्या होत्या. मारु नका, तुम्हाला काय न्यायचे ते न्या, असे महिलांनी सांगितल्यानंतर दरोडेखोरांनी संसारोपयोगी साहित्याची उचकपाचक करत सुमारे ५० तोळे सोने व दोन लाख रुपये घेऊन गेल्याचे सून आरती नागरगोजे यांनी पोलिसांना माहिती दिली.

पैसे मिळाल्याने दरोडेखोरांचा डान्स

पैसे आणि सोने मिळाल्यानंतर दरोडेखोरांनी नागरगोजे यांच्या बंगल्यात डान्स केला. त्यातील दोघांनी मास्क घातले होते. त्यातील एकजण रेकीसाठी एक दिवसापूर्वी घराबाहेर दिसल्याचे आरती नागरगोजे यांनी पोलिसांना सांगितले.