जितेंद्र भावे यांची आपमधून हकालपट्टी

महिला शिक्षणाधिकार्‍यांविरोधात सोशल मिडीयाच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाषा वापरल्याने पक्षाची कारवाई

नाशिक : सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणारे आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा नाशिकचे कार्याध्यक्ष जितेंद्र भावे यांची पक्षातून हकालपटटी करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍यांविरोधात सोशल मिडीयाच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाषा वापरल्याने पक्षाने त्यांच्यावर ही कारवाइ केली आहे.

नाशिक महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आम आदमी पक्षाने शहरातील सर्व जागांवर तयारी सुरू केली आहे. याकरीता नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्याध्यक्षपदी जितेंद्र भावे यांची नियुक्तीही करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच भावे यांची पक्षातून हकालपटटी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भावे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना काळात रूग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी प्रकरणी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोहिमच उघडली. या काळात अनेक रूग्णांना त्यांनी दिलासाही मिळवून दिला.

परंतु महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या महिला अधिकारयांविरोधात सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रश्न मांडत असतांना त्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवले. भावे यांचे वर्तन चुकीचे असल्याचे निरीक्षण नोंदवत पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांचे निलंबन केल्याचे रंगा राचुरे, किशोर मानध्यान, विजय कुंभार, धनंजय शिंदे यांनी कळविले आहे.

पक्षाने राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाचे पथक नाशिकला पाठवले होते. या पथकाने सर्व संबंधित व्यक्तींना भेटून त्यांच्याशी चर्चा केली आणि जितेंद्र भावे यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल आणि त्यानंतर केलेल्या कृतीबद्दल अजिबात पश्चाताप होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे जितेंद्र भावे यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात येत आहे.

-धनंजय शिंदे, राज्य सचिव, आम आदमी पार्टी

मी पक्षाचा राज्य सदस्य आहे तसेच नाशिकचा कार्याध्यक्ष आहे. माझया निलंबनाबाबत सोशल मिडीयावरून पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु पक्षात कारवाइसाठी एक प्रक्रिया असते. मला अद्याप लेखी कोणतेही पत्र पक्षाकडून आलेले नाही त्यामुळे आता याविषयी बोलणे उचित होणार नाही. परंतु अशा प्रकारची कारवाइ झाली असल्यास योग्य तो निर्णय घेऊ.

-जितेंद्र भावे