उच्चशिक्षित मनोरुग्णाने घेतली चौथ्या मजल्यावरून उडी

नाशिक : दिंडोरी रोडवरील व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या मनोरुग्ण तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा तरुण तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत होता. आशिष शरद जाधव (वय १८, रा. राजापूर, ता. दिंडोरी) असे त्याचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत असलेल्या आशिषच्या मनावर काही परिणाम झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले होते. त्यास दिंडोरी रोडवरील सारस मानस उपचार व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात दाखल केले होते. २ ऑगस्टला आशिष याने केंद्राच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ११ ऑगस्टला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शनिवारी (दि. १३) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार सहायक उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ तपास करत आहेत.