घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकैलास नागरी पतसंस्था अपहार प्रकरण : शिक्षण दहावी, जबाबदारी कॅशिअरची

कैलास नागरी पतसंस्था अपहार प्रकरण : शिक्षण दहावी, जबाबदारी कॅशिअरची

Subscribe

नाशिक : कर्मचारी नेमणुकीचा अजब प्रकार कैलास नागरी पतसंस्थेत उघडकीस आला आहे. कामाच्या सोयीनुसार शिपाई म्हणून काम करणार्‍या दिनकर मोरे यांना थेट कॅशियर म्हणून नियुक्त करण्यात आले. कामाचा कुठलाही अनुभव नसलेल्या आणि शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झालेल्या मोरेंना कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाणीची जबाबदारी देण्यात आली. संस्थेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत असताना आपल्याला काहीच माहित नाही असा दावा करणार्‍या मोरेंची भूमिका संशयास्पद असून, मोरेंना नियुक्त करण्यामागील मास्टरमाईंड कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. मोरे हे एका संचालकाचे अत्यंत जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे.

कैलास नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५ कोटी ३४ लाख रुपयांच्या अपहारातील दिनकर दारकू मोरे यांनी जबाबात अनेक गोष्टींचा खुलासा केला. आपले शिक्षण जेमतेम दहावी झालेले असून, सुरुवातीपासूनच संस्थेत शिपाईपदावर कार्यरत आहे. संस्थेचे संगणकीकरण झाल्यानंतर संगणकाचे कोणतेही ज्ञान नसल्याने शिपाई म्हणूनच कार्यरत होतो. संस्थेचे कामकाज चालू असताना कर्मचारी कमी असल्याने व्यवस्थापक शैलेंद्र गायकवाड व लिपिक अनिल पाटील यांच्या तोंडी सूचनेवरून कॅशियरचे काम पाहिले होते. तेव्हा फक्त रोख रक्कम स्वीकारणे आणि पेमेंट करणे एवढेच काम होते. नंतर त्यापुढे कॅशियरची जबाबदारी टाकण्यात आली. मोरे यांनी आपण अज्ञानी असल्याचे जबाबात मान्य केल्याने संस्थाचालकांनी कोणत्या निकषावर त्यांची नियुक्ती केली याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थेने जाहिरात देऊन संगणक किंवा कॅशियरपदाचा अनुभव असणार्‍या व्यक्तीला नियुक्त करणे गरजेचे असताना मोरे यांना थेट कॅशियर म्हणून नियुक्त केल्याने कोट्यवधींची देवाण-घेवाण कशा पद्धतीने केली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशिक्षित तसेच कामाचा अनुभव नसलेल्या कर्मचार्‍यांची नेमणूक करून संस्थाचालकांनी ठेवीदार व खातेदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मोरेंची नियुक्ती तात्पुरती की कायमस्वरूपी असा कुठलाही ठराव संस्थेने केला नाही. मग एवढी मोठी जबाबदारी कशाच्या आधारावर मोरेंवर टाकण्यात आली. असे अशिक्षित कर्मचार्‍यांची नेमणूक करून संस्थाचालकांनी सहकार कायद्याला हरताळ फासल्याची भावना ठेवीदारांमधून व्यक्त होत आहे. याप्रकरणातील दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

आपलं महानगरचे काही प्रश्न

  • व्हाऊचरवर खातेदारांच्या सह्या नसताना संस्थेतून रक्कम काढली जात होती. सही आणि व्हाऊचर तपासणे ही मुख्य लिपिकाची जबाबदारी होती, असा दावा मोरेंनी जबाबत केला आहे. परंतु, सह्या नसताना मोरे यांनी पैसे का दिले?
  • संस्थेत रोख रक्कम भरणा करण्याची जबाबदारीदेखील मुख्य लिपिकाची होती. परंतु, भरणा होतच नव्हता ही बाब लक्षात आल्यानंतर मोरे यांनी संस्थाचालकांना याविषयी कल्पना का दिली नाही?
  • संस्थेत ५ कोटी ३४ लाख रुपयांचा गैरव्यवहार होत असताना आपल्याला काहीच माहित नाही, असा बचाव कॅशिअर पदावरील मोरे कसे करू शकतात?
  • अशाप्रकारे अशिक्षित कर्मचार्‍यांची नेमणूक कॅशिअर म्हणून करत संस्थाचालकांनी ठेवीदारांच्या भावनांशी खेळ खेळला नाही का?
  • असे कर्मचारी नियुक्त करत संस्थाचालकांनी स्वार्थासाठी संस्था उघडली का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -