घरमहाराष्ट्रनाशिकपंचांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचे आदेश

पंचांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचे आदेश

Subscribe

वैदू समाजातील जात पंचायतीचे हिडीस स्वरुप; सहा पंचांविरुध्द जालन्यात गुन्हा दाखल

सासरच्या मंडळींवर कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला म्हणून जालना जिल्ह्यातील एका २८ वर्षीय पीडितेसह तिच्या कुटुंबियांना वैदू जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, तर पंचांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचेही आदेश पंचायतीने दिले. शिवाय पीडितेच्या बहिणीचे ठरलेले लग्न तोडण्यात आल्याचा हिडीस प्रकार घडला. संबंधित सहा पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील राजूर येथील पीडितेचे ६ नोव्हेंबर २००९ ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील ज्ञानेश्वर राजे याच्यासोबत लग्न झाले. काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून मोटारसायकल घेण्यासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात येऊ लागली. ती देण्यास असमर्थता दाखविल्यानंतर पीडितेला मारहाण करण्यात आली. मुलीने माहेरी या त्रासाबाबत माहिती दिल्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर जात पंचायतीने नवर्‍याचे दुसरे लग्न लावून दिले. त्यामुळे पीडितेने गोकरदन येथे नवर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे प्रकरणही जात पंचायतीपर्यंत गेले आणि पंचायतीने पीडितेसह तिच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले. त्यानंतर पीडिता व कुटुंंब एका लग्नासाठी गेले असता त्यांना अक्षदा देऊ नका, त्यांनी जातीची बदनामी केली असल्याने जातीबाहेर काढण्यात आल्याचे पंच तात्या रामा शिवरकर, अण्णा मल्लू गोडवे यांनी जाहीर केले. ही ‘मोगलाय माल’ आहे, अशा शब्दात पीडितेची बदनामी करत तिला लग्न मंडपातून बाहेर काढले. जेवणासाठी पंक्तीत बसले असता शिवीगाळ करुन पत्रावाळीस लाथा मारून अंगावर थुंकले व पंक्तीमधून उठवून दिले. नवर्‍याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला म्हणून ही महिला जात पंचायतीसाठी कलंक आहे, असे सांगण्यात आले. तिच्या बहिणीचे ठरलेले लग्न पंचायतीने मोडले. या प्रकरणी पंच तात्या रामा शिवरकर, अण्णा गोडवे, मोतीराम चव्हाण, शामराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, तात्या ठिदे आणि दालीरामा लासुण यांच्याविरुद्ध सामाजिक बहिष्कार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जात पंचायतीने अशी दिली होती शिक्षा

‘यापुढे ही मुलगी जात पंचायतीच्या पंचाची हक्काची माल आहे. तिच्यावर तिच्या आई वडीलांचाही अधिकार नाही. तिला कोणाला विकायचाही अधिकार नाही. संपूर्ण अधिकार पंचांना आहे. या मुलीसोबत झोपण्याचा अधिकार फक्त जात पंचायतीच्या पंचांना आहे. जो कोणी पंचांना ५ लाख रुपये देईल. त्याच्या ताब्यात या मुलीला देण्यात येईल. जर मुलीला बाळ झाले तर त्यावर पंचांचा मालकी हक्क असेल. मध्यंतरीच्या काळात ही मुलगी पंचसेवेसाठी आली नाही व तिच्या आई वडीलांनी देखील तिला पंचांकडे पाठवले नाही, म्हणून कुटूंबियांना पूर्णत: वाळीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे या मुलीसह तिच्या कुटूंबियांना वैदू समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमात येऊ देऊ नये. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजार राहू नये. तिच्या दोन्ही बहिणींचे जमलेले लग्न तोडण्यात यावे. हुकूमाचे पालन न केल्यास त्यास २ लाख रुपये दंड व वाळीत टाकण्यात येईल.’

नागपूरला गतिमंद मुलीवर अत्याचार

नागपूर येथेही नुकताच जात पंचायतीचे हिडीस रूप बघायला मिळाले. एका २५ वर्षीय गतिमंद मुलीवर दोन नातेवाईकांनीच अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या आरोपींवर फौजदारी कारवाई होणे अपेक्षित असताना जातपंचायतने शुद्धीकरण करून घेत त्यांच्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. व्यंकटेश पप्सलेटी (३२) रा. गरवाल, करनुल, तेलंगणा आणि रामू गोपाल बोई (२६) रा. सोलापूर रोड, उस्मानाबाद अशी आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी मूळची तेलंगणाची रहिवासी आहे. कामाच्या शोधात तिचे आई-वडील २० वर्षांपूर्वी नागपुरात आले. हे कुटुंब वाडी परिसरात वास्तव्यास असून आई चहाची टपरी चालविते. तिच्या लहान बहिणीचे लग्न झाले आहे. आरोपींपैकी व्यंकटेश हा पीडितेच्या आईचा चुलत भाऊ, तर रामू भाचा आहे. दोघांचेही नेहमीच पीडितेकडे जाणे-येणे होते. तरुणी दुपारी एकटीच घरी राहत होती. दोन्ही आरोपी एप्रिल २०१८ पासून तिच्यावर अत्याचार करीत होते. तिला दिवस गेल्याने आरोपींच्या पापाचे भांडे फुटले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

- Advertisement -

जळत्या फांद्यांखालून ७ फेर्‍या

२९ ऑक्टोबर २०१८ ला देशाच्या विविध भागांतून पंच आले. त्याच दिवशी या तिघांना शुद्ध करून घेण्याची ही प्रक्रिया पार पडली. आरोपी व्यंकटेश आणि रामू यांच्यासह पीडित तरुणी आणि रामूची पत्नी या चौघांना सुकलेल्या फांद्यांना आग लावून त्या जळत्या फांद्यांच्या खालून ७ फेर्‍या मारायला लावण्यात आल्या. यानंतर एका महिन्यात तुमच्या मुलीचे लग्न लावून देऊ, असे आश्वासन देऊन पंच परतले. पीडिता आता आठ महिन्यांची गरोदर आहे. तिचा गर्भपात होणेही शक्य नसल्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

पंचांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचे आदेश
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -