घरमहाराष्ट्रनाशिकमाणिकराव कोकाटेंची भाजपातून हकालपटटी

माणिकराव कोकाटेंची भाजपातून हकालपटटी

Subscribe

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षशिस्तीचा भंग करून महायुती उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पक्षाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी कोकाटे यांना पत्राद्वारे कळवले आहे.

युतीच्या ताब्यात असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. मात्र, माघारीनंतरही त्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका कायम ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र, त्यात अपयश आल्याचे बोलले जाते. मराठा मतांचे विभाजन होऊन आघाडी उमेदवाराला याचा फायदा होण्याची शक्यता असल्याने अखेरपर्यंत कोकाटेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते; परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाल्याने कोकाटे यांचा भ्रमनिरास झाला. मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे कोकाटे यांनी केलेली तयारी वाया जाऊ नये म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर करत जोरदार प्रचार सुरू केला आहे. नाशिकमध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी किंवा भाजपने मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला भाजपाची फूस आहे काय असा अर्थ काढला जात होता. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोकाटेंबाबत भाजपने योग्य ती भूमिका घ्यावी, असे वक्तव्य केले होते. दोन दिवसांपूर्वीच शिर्डीतील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचीही पक्षातून हकालपटटी करण्यात आली. त्यामुळे कोकाटेंवरही पक्षशिस्तभंगाची कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

- Advertisement -

आतली बातमी

नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपची युती असली तरीही उमेदवार सेनेचा असल्याने काही ‘भाजपेयी’ त्यांच्याऐवजी कोकाटे यांच्या प्रचारकार्यात फिरत असल्याचे बोलले जाते. कोकाटे निवडून आले तर भाजप खासदारांची संख्या एकाने वाढेल, असा कयास बांधत कोकाटेंना भाजप जाणीवपूर्वक पक्षातून काढत नसल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये काही दिवसांपासून कोकाटेंची पक्षातून हाकलपट्टी करुन मतदारांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली जात होती. त्याची दखल घेत भाजपने ही कारवाई केल्याचे समजते.

मी पक्षाचा राजीनामा दिला

भाजपने माझी उमेदवारी नाकारताच मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याची एक प्रत माझ्याकडे असल्यामुळे भाजपने हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यांनी केलेली कारवाई म्हणजे वराती मागून घोडे आहेत. – अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, अपक्ष उमेदवार (नाशिक लोकसभा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -