नाशिक शहरासह जिल्हयातील अनेक पंपांवर डिझेलचा तुटवडा

इंधन तुटवड्यामुळे मशागतीच्या कामांवर परिणाम होण्याची दाट शक्यता

नाशिक : पेट्रोल पंपचालकांनी अबकारी कर कपातीविरोधात पुकारलेले खरेदी बंद आंदोलन आणि भारत पेट्रोलियम कंपनीकडून डिझेल पुरवठा कमी होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करत तीनही पेट्रोल कंपन्यांना इंधन पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.

केंद्र सरकारने अबकारी करात कपात केल्याने पेट्रोल दरात कपात करण्यात आली यामुळे पेट्रोल डिलर्सना कमी किंमतीत पेट्रोल विक्री करावे लागत आहे. याविरोधात पंप चालकांनी ३१ मे रोजी खरेदी बंद आंदोलन केले. त्यातच कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलमागे २० ते २५ रूपये लिटरची वाढ हवी आहे. पण ही वाढ पेट्रोलियम मंत्रालय करू देत नाही. त्यामुळे कंपन्या पंपांना इंधन पुरवठा पुरेश्या प्रमाणात कमी करत आहेत. पूर्वी दोन ते तीन दिवसांच्या उधारीवर कंपन्या कंपन्यांना इंधनाचा पुरवठा करायच्या, पाण आता आगाऊ रोख रक्कम भरूनही दोन दिवसानंतर टँकर पंपावर पोहचत आहेत. तोपर्यंत पंपाबाहेर इंधन नसल्याचा फलक लावावा लागतो. शहरासह जिल्हयात भारत पेट्रोलियमच्या पंपाची संख्या सर्वाधिक असल्याने विशेष करून डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आपोआपच इतर पंपावर भार वाढला आहे.

विशेषतः ग्रामीण भागात डिझेल तुटवडा निर्माण झाला असून मशागतीची कामांवर त्यांचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या तीनही कंपन्यांना पत्र देत इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे कळविले आहे तसेच याबाबत अहवाल प्रशासनाला सादर करण्याबाबतचे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

 

काही प्रमाणात इंधन पुरवठा सुरळीत झाला आहे. पंपचालकांनी खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे इंधन टंचाई भासणार नाही. काही भागात टंचाई असेल परंतू, लवकरच टँकर उपलब्ध होऊन पुरवठा सुरळीत होईल.
– भूषण भोसले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशन