‘लेरिंगोस्कोपी’मुळे ५५ चिमुकल्यांना जीवदान, ‘सिव्हिल’मधील डॉक्टरांची कामगिरी

खेळता-खेळता चिमुकल्यांनी बाटलीचे झाकण, लहान डबी अथवा नाणे अनवधानाने गिळल्याचे समजताच पालकांसह नातेवाईकांची धावपळ सुरू होते. बहुतांश घटनांमध्ये श्वसनातच अडथळे निर्माण होत असल्याने, तातडीने वैद्यकीय मदतीसाठी नातेवाईकांची धावपळ सुरू असते. या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या असल्याने खासगी रुग्णालयातील डॉक्टरही उपचारास धजावत नाहीत. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. संजय गांगुर्डे व डॉ.सिद्धार्थ शेळके यांनी यशस्वी लेरिंगोस्कोपी शस्त्रक्रिया करत आजवर ५५ चिमुकल्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले आहे.

सुरगाणा तालुक्यातील अवळपाडा येथील नऊ वर्षाच्या पायल अशोक वरडे हिने शुक्रवारी (दि.७) सायंकाळी घरासमोर खेळत असताना एक रुपयाचे नाणे अनवधानाने गिळल्याने ते तिच्या श्वसननलिकेत अडकले. तिला त्रास होऊ लागल्याने आईवडिलांनी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात कान, नाक व घसातज्ज्ञ नसल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात घेवून जाण्यास सांगितले. त्यानुसार तिला आईवडिल रात्री १२.३० वाजता जिल्हा रुग्णालयात घेवून आले. डॉ. संजय गांगुर्डे व डॉ. सिद्धार्थ शेळके यांनी एक्स रे तपासणी केली असता तिच्या घशातील श्वसननलिकेत नाणे अडकल्याचे दिसले. भूलतज्ज्ञ डॉ. वलावे यांनी तिला भूल देण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री १.३० वाजता डॉ. गांगुर्डे व डॉ. शेळके यांनी दुर्बिणीव्दारे श्वसननलिकेवर अडकलेले नाणे लेरिंगोस्कोपीच्या सहाय्याने काढून तिला जीवदान दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी कान, नाक व घसा विभागाचे डॉ. गांगुर्डे, भूलतज्ज्ञ डॉ.वलावे, डॉ.गाडेकर, तेजस कुलकर्णी, अतुल पवार यांचे अभिनंदन केले.


वेळीच शस्त्रक्रिया केल्याने ५५ चिमुकल्याचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरलो आहोत. श्वसननलिकेत डबी व नाणे अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याने चिमुकल्यांची प्रकृती नाजूक बनली होती. थोडाही उशीर झाला असता तर जीवावर बेतले असते. पालकांनी घाबरुन जावू नये. चिमुकल्यांना खोकू देवू नये. त्यांना लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणावे.
डॉ.संजय गांगुर्डे कान, नाक, घसातज्ज्ञ