पाच दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ

नाशिक : आदिवासी विकास विभाग व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोल्फ क्लब मैदानावर आयोजित पाच दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवास शुक्रवार (दि.२७)पासून प्रारंभ झाला. महोत्सवाचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात आदिवासी रुढी, पंरपरा, कला व संस्कृती यांचे संवर्धन व प्रचार-प्रसिद्धी होईल, असा विश्वास ना. झिरवाळ यांनी व्यक्त केला.

महोत्सवात राज्यभरातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. त्यात पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गवताच्या वस्तू, वेतकाम, बांबूकाम, काष्टशिल्पे, धातूकाम, मातीकाम, वनौषधी, लाकडी व लगद्याचे मुखवटे आदींचा समावेश आहे. या वस्तू खरेदीसाठी आदिवासी सांस्कृतिक मूल्यांची आवड असणार्‍या नागरिकांना पाच दिवस संधी मिळणार आहे. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी विकास मीणा आदी उपस्थित होते. दरम्यान, महोत्सवाची माहिती सर्वसामान्य नाशिककरांपर्यंत पोहोचली नाही. त्यातच मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती न लाभल्याची खंत ना. झिरवाळ यांनी व्यक्त केली.