घरमहाराष्ट्रनाशिकओतूर धरणाला गळतीचे ग्रहण कायम

ओतूर धरणाला गळतीचे ग्रहण कायम

Subscribe

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फूटल्यानंतर धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

राकेश हिरे, सटाणा

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फूटल्यानंतर राज्यभरातील धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील ओतूर धरणाची गळती रोखण्यात गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. धरण दुरुस्तीची वारंवार मागणी करणार्‍या ओतूर खोर्‍यातील नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणारे प्रशासन तिवरे सारख्या दुर्घटनेची वाट बघतयं का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

- Advertisement -

ओतूर खोर्‍यातील एकमेव धरणाला अनेक वर्षांपासून गळती लागलेली आहे. दरवर्षी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. पाणी वाया जात असल्याने उन्हाळ्यात खोर्‍यातल्या वीस- पंचवीस गावातील शेतकर्‍यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. १९७२ मध्ये धरणाचे काम सुरू होवून १९७७ मध्ये पूर्ण झाले. मात्र, कालांतराने धरणाला गळतीचे ग्रहण लागले. गळती थांबवणे व दुरुस्तीसाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. विशेष दुरुस्तीसाठी पाटबंधारे खात्याने निविदा प्रक्रिया काढल्यानंतर कामाला मुहूर्त लागला होता. पंरतु, तांत्रिक अडचणीमुळे आजमितीस काम बंद असल्याने ओतूर परिसरातील ओतूर, नरूळ, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी, दह्याने, कळवण खुर्द गावातील शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे.

2012 ला निविदा प्रक्रियेनंतर शासनाने या कामाचा ठेका औरंगाबाद येथील ठेकेदाराला देवून दोन वर्षात काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासकीय मान्यता देताना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांचे पालन न केल्याने दुरुस्तीचे काम रखडले. निधी कुणाच्या खिशात गेला, याची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे. वारंवार दुरुस्तीची मागणी केली जात असताना प्रशासकीय यंत्रणेकडून डोळेझाक करण्यात येत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

- Advertisement -

ग्रामस्थ म्हणतात…

वारंवार निवेदन, मागणी, पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. ’धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी या परिसरातील शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे. शेतकर्‍यांची सहनशीलता संपली असून नेत्यांनी राजकारण थांबवून कामाला प्राधान्य द्यावे. – देवा भुजाडे, ग्रामस्थ, ओतूर

ओतुर धरणाची गळती रोखण्यासाठी नेहमीच आश्वासने दिली जातात. पण अद्यापपर्यंत ना प्रशासन गळती रोखु शकले ना लोकप्रतिनिधी. यामुळे आता आश्वासनांचीही सवय झाली आहे. – शाबान पठाण, ग्रामस्थ

आश्वासनापलीकडे काहीच नाही

ओतूर धरणाची गळती रोखावी व दुरुस्तीचे काम तत्काळ व्हावे, यासाठी परिसरातल्या शेतकर्‍यांनी नेहमीच लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. मात्र, कुठलीच कार्यवाही होत नसल्याने 24 जानेवारी 2019 रोजी ओतुरकरांनी कळवण बसस्थानकासमोर रास्ता रोको देत प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्याही वेळेस आश्वासनापलीकडे काहीच न मिळाल्याने ओतुरकरांच्या पदरी निराशाच आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -