नाशिक : केंद्र सरकारने गेल्या ९ वर्षात जनतेची घोर फसवणूक केली असून त्यांनी फक्त लोकांना थापा दिल्या, आपली पोळी भाजून घेतली. या सरकारचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी खेड्यापाड्यावर आणि बांधा बांधावर, चौका चौकात ’होऊन जाऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवा, असे आवाहन शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. ’होऊन जाऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाचा शुभारंभ मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा मंध्यवर्ती कार्यालय, शालिमार येथे झाला. नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनीधी यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते
प्रत्येकाच्या खात्यात15 लाख जमा झाले का, 2 कोटी लोकांना नोकर्या मिळाल्यात का? पेट्रोल दर कमी झाले का? गॅस 500 रुपयाला मिळतो का? बुलेट ट्रेन धावली का? महिलांवरील अत्याचार कमी झालेत का ? स्मार्ट सिटीसाठी पैशांची वारेमाप उधळपट्टी झाली. मात्र त्या सिटी स्मार्ट झाल्यात का? गॅस सबसिडी परत सुरू झाली का? विविध घटकांसाठी असलेली आणि बंद झालेली रेल्वे सवलत पुन्हा सुरू झाली का? आदी मुद्दे विचारून केंद्र सरकार विरुद्ध जनतेत जागृती करा त्यांच्यात मिसळा त्यांचे प्रश्न जाणून घ्या ते सोडवण्याचा प्रयत्न करा असेही मिर्लेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जनतेच्या हिताचे जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्याची माहिती जनतेसमोर मांडा आणि त्यासाठीच ’होवू द्या चर्चा’ हा उपक्रम पक्षप्रमुखांच्या आदेशाने सुरू झाला आहे आणि तो यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे असे मिरलेकर यांनी पुढे स्पष्ट केले. व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वंसत गिते, माजी मनपा गटनेते विलास शिंदे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, महिला आघाडीच्या संपर्क संघटक रंजना नेवाळकर, संगीता खोडाना, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, निवृती जाधव, दिपक खूळे, देवानंद बिरारी, महेश बडवे, युवासेना जिल्हाधिकारी बालम शिरसाठ, भा.वि.से.जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के आदी हजर होते.