घरमहाराष्ट्रनाशिकगुणाजी जाधव खून खटल्यात व्यंक्या मोरेसह ७ जणांना जन्मठेप

गुणाजी जाधव खून खटल्यात व्यंक्या मोरेसह ७ जणांना जन्मठेप

Subscribe

पूर्ववैमनस्यातून झालेल्या गुणाजी जाधव खूनप्रकरणात न्यायालयाने बुधवारी, ८ मे रोजी व्यंक्या उर्फ व्यंकटेश नानासाहेब मोरे याच्यासह ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पूर्ववैमनस्यातून झालेल्या गुणाजी जाधव खूनप्रकरणात न्यायालयाने बुधवारी, ८ मे रोजी व्यंक्या उर्फ व्यंकटेश नानासाहेब मोरे याच्यासह ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वीच्या या खूनखटल्यातील आरोपी बाळ्या उर्फ निखिल मनोहर मोरे याचीही २०१७ मध्ये एका टोळीने गोळ्या झाडून हत्या केली होती. ११ पैकी ३ आरोपींना संशयाचा फायदा मिळाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता झाली. या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रमुख सूत्रधार व्यंक्या मोरे हा घटनास्थळी उपस्थित नसला तरीही मोबाइलद्वारे त्याने संपूर्ण कट रचल्याचे पुरावे पुढे आल्याने न्यायालयाने त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गुणाजी जाधव आणि निखिल मोरे (म्हसरुळ) यांच्यात भांडण झाल्याने, त्याचा राग मनात धरून निखिलने १६ मे २०१५ रोजी या खटल्यातील आरोपींच्या मदतीने हॉटेल तुळजा येथे गुणाजी जाधव व त्याचे मित्र किशोर मोरे, विकी दिवे, सागर परदेशी यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी गुणाजी जाधव याचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे साक्षीदार गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध खून, जीवघेणा हल्ला अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. या खटल्याचा निकाल देताना बुधवारी जिल्हा न्यायालयाने ७ आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ५८ हजार रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. रवींद्र निकम यांनी युक्तिवाद केला. या खटल्यातील निखिल मोरेचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे, तर हर्षद उर्फ हिरंभ पोपट निकम (रा. त्रिमूर्ती चौक), जॉन उर्फ विराज उर्फ अनिल देविदास रेवर (रा. आरटीओ कॉर्नर परिसर) आणि कामड्या उर्फ संजय रमेश बोरसे (रा. अशोक स्तंभ) या तिघांना संशयाचा फायदा मिळाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

- Advertisement -

दरम्यान, समीर दत्तात्रय व्यवहारे (रा. रामवाडी), सुनील हंसराज सेनभक्त (रा. म्हसरुळ), अंकुश रामचंद्र मगर (रा. रामवाडी), अमित दत्तात्रय व्यवहारे (रा. रामवाडी), अँडी उर्फ दीपक वाघमारे (रा. विडी कामगार नगर, पंचवटी), व्यंक्या उर्फ व्यंकटेश नानासाहेब मोरे (रा. कामटवाडा, सिडको) आणि सुशील मनोहर गायकवाड (रा. मखमलाबाद नाका) या सर्व आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, प्रत्येकी ५८ हजार रुपये दंडही ठोठावली. या प्रकरणात न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले, त्यात ४ प्रत्यक्षदर्शींचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -