ठाकरे गटावर कडी; शिंदे गटाने केले जॉगिंग ट्रॅकचे पुन्हा भूमिपूजन

नाशिक : कर्मयोगीनगर येथील जॉगिंग ट्रॅकचे उद्घाटन यापूर्वीच ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी केलेले असताना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पुन्हा एकदा या ट्रॅकचे उद्घाटन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर कर्मयोगीनगरच्या जॉगिंग ट्रॅकचे काम त्वरित सुरू करावे, गतिरोधक बसवावेत, रस्ते, उद्यानांची दुर्दशा थांबवावी यांसह विविध मागण्यांसाठी त्यावेळेची उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि सत्कार्य फाऊंडेशनच्या वतीने आर. डी. सर्कलवर डिसेंबर २०२२ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. १५ महिन्यांपासून ही कामे रखडली होती. याविरोधात झालेल्या आंदोलनांची दखल घेत आर. डी. मायनिंग इक्विपमेंट कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २२ डिसेंबर २०२२ ला सत्कार्य फाऊंडेशनचे बाबासाहेब गायकवाड आणि चारुशीला गायकवाड यांच्या हस्ते जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, सत्ताधारी शिंदे गटाकडून पुन्हा एकदा या ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, माजी आमदार निर्मला गावीत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

घोटीकडून घराकडे जात असताना हा भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होता. प्रवीण तिदमे यांनी माझी गाडी थांबवून कार्यक्रमास येण्याची विनंती केली. त्यानुसार मी तेथे गेली. परंतु, या ट्रॅकचे यापूर्वी भूमिपूजन झाले याची मला कल्पना नव्हती. महत्वाचे म्हणजे आर. डी. सर्कल काढून तेथे सिग्नल बसवावे, अशी आग्रही मागणी मी यापूर्वी केलेली आहे. : निर्मला गावीत, माजी आमदार

यापूर्वी बाजीराव नगरच्या रस्त्याकडील भागाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सीएसआर फंडातील हे काम आहे. हे कामही माझ्या पाठपुराव्यामुळेच मंजूर झाले आहे. यासंदर्भातील कागदपत्रेही माझ्याकडे आहेत. परंतु, केवळ विरोध करायचा म्हणून असे खोटे आरोप करण्यात येत आहेत. : प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, शिवसेना