मतदान केंद्रांचे होणार लाईव्ह वेबकास्टिंग

तयारी लोकसभेची : जिल्हाधिकार्‍यांनी घेतला कायदा सुव्यवस्थेचा आढावा

Polling_booth
प्रातिनिधीक फोटो

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवतंत्रज्ञाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी म्हणून यंदा प्रथमच जिल्हयातील सर्व मतदान केेंद्राचे लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यामुळे मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत होईल, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ यांनी सांगितले. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहाण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत आज जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली.

लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी म्हणून यंदा निवडणुकीच्या ठिकाणी लाइव्ह वेब कास्टिंगचा प्रयोग करण्यात येणार आहे. पूर्वी केवळ संवेदनशील मतदान केंद्रांवरच हा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, यंदा सर्वच मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरासह वेबकास्टिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नियंत्रण कक्षातून मतदान केंद्रांवर आधुनिक पद्धतीने थेट देखरेख ठेवणे सोपे होणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. तसेच लाइव्ह वेबकास्टिंग आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होणार असल्याने मतदान प्रक्रिया सर्वसामान्यांनाही घरबसल्या पाहता येईल. तसेच कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलीस प्रशासनाच्या तयारीचाही गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकित आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, या केंद्रावर द्यावयाचा पोलीस बंदोबस्त, मागील निवडणुकीत गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची यादी, उपलब्ध पोलीसबळ, आवश्यक पोलीस कर्मचारी, होमगार्ड याची माहिती सविस्तरपणे अहवाल स्वरुपात सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची माहिती तक्त्यात भरून देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, निवडणूक तहसिलदार गणेश राठोड, नायब तहसिलदार अमित पवार यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

दुर्गम भागात वायरलेस यंत्रणा

मतदान केंद्रावर उपलब्ध पायाभूत सुविधांबाबत आयोगाने आढावा घेतला असता जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, कळवण आणि दिंडोरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील १३० मतदान केंद्रांवर रेंजची समस्या असल्याने येथे इंटरनेट किंवा मोेबाईलला रेंजच नाही. त्यामुळे येथे वायरलेस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.