घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलोकसभा पडघम : कोकाटे-ढिकले सामना की, आजी-माजी पुन्हा आमने-सामने

लोकसभा पडघम : कोकाटे-ढिकले सामना की, आजी-माजी पुन्हा आमने-सामने

Subscribe

नाशिक : राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध डॉ. सुनील ढिकले यांच्यात झालेला चुरशीचा सामना लोकसभा निवडणुकीत पुन्हा रंगण्याची चर्चा आता होत आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसह आजी-माजी खासदारांनी चाचपणी सुरू केल्यामुळे लोकसभेची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू झाल्याचे दिसून येते.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आल्यापासून म्हणजेच 2014 पासून नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहेत. सलग दोन वेळा निवडून येण्याचा विक्रम कै.भानूदास कवडे यांच्यानंतर खासदार गोडसे यांच्या नावापुढे लिहिला गेला. 2024 मध्ये आता लोकसभा निवडणूक होणार असली तरी त्यापूर्वीच उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. सहा विधानसभा मतदारसंघांमिळून लोकसभेचा एक मतदार संघ तयार होतो. नाशिक शहरातील तीन, देवळाली विधानसभेसह त्र्यंबकेश्वर-इगतपुरी आणि सिन्नर हा विधासनभेचा मतदारसंघ नाशिक लोकसभेत येतात. एवढ्या विशाल मतदारसंघाची तयारी करायची म्हटल्यावर किमान वर्षभरापूर्वी तयारी करावी लागते.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकारचा उदय झाला. शिवसेनेच्या 40 आमदारांपाठोपाठ 12 खासदारांनी बंड करत शिंदे गटात प्रवेश केला. यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचाही समावेश असल्यामुळे आता येणार्‍या लोकसभा निवडणुकीत नाशिकची जागा शिंदे गटाला सोडली जाते की, भाजप स्वत:चा उमेदवार रिंगणात उतरवणार हे सर्वात महत्वाचे आहे. भाजपने ही जागा शिंदे गटाला दिली तर हेमंत गोडसे यांना उमेदवारीची संधी मिळू शकते. शिवसेनेकडून उमेदवारी न मिळण्याची संधी ओळखूनच गोडसेंनी शिंदे मार्गाचा अवलंब केल्याचेही बोलले जाते. त्यांच्याविरोधात शिवसेना स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवू शकते. भाजपने स्वतंत्र उमेदवार दिला तर मविप्र समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले यांचा विचार होऊ शकतो. त्यादृष्टीने आता भाजपच्या गोटातून चाचपणी सुरु झाली आहे. मध्यंतरी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु, मविप्र संस्थेच्या निवडणुकीनंतर ही चर्चा अचानकपणे थांबली आणि डॉ.ढिकले यांचे नाव चर्चेत आले. विशेष म्हणजे अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आमदार अ‍ॅड.राहुल ढिकले यांनी डॉ.सुनील ढिकलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली. त्यानंतरच खर्‍या अर्थाने लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली.

तथापि, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्रपणे याचाही प्रामुख्याने विचार करावा लागेल. राष्ट्रवादीकडून माजी खासदार समीर भुजबळ हे देखील लोकसभेचे उमेदवार होऊ शकतात. त्यामुळे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना लोकसभा निवडणूक लढवायची झाल्यास पक्षाकडून अगोदर उमेदवारी मिळवावी लागेल. अन्यथा काँग्रेस व शिवसेनेचा पाठिंबा त्यांना घ्यावा लागेल. कारण शिवसेनेतही या निवडणुकीसाठी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या व्यतिरीक्त दुसरा उमेदवार तयारी करताना दिसत नाही. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजेंनी आमदार कोकाटेंना लोकसभेसाठी चाल दिली तर विधानसभेला त्यांना फायदा होऊ शकतो. पण सद्यस्थिती बघता याविषयी दोघांमध्ये काही बोलणी होऊ शकेल, असे वातावरण दिसत नाही. राजकारणात अशक्य काहीच नसल्यामुळे येत्या वर्षभरात राजकीय समीकरणे अधिक गतिमान होतील, अशीच सध्याची परिस्थिती आहे.

- Advertisement -
तर भाजपचा उमेदवार रिंगणात

शिंदे गटाविषयी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यांच्याविषयी न्यायालय काय निकाल देणार आणि शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’वर कुणाचा अधिकार राहणार, या दोन्ही निकालानंतर भाजप लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेला तर भाजप स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

म्हणूनच खा. गोडसे शिंदे गटात

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही खासदार हेमंत गोडसे यांना शिवसेनेने उमेदवारीची संधी दिली. त्यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे उमेदवारीचा दावा करत होते; परंतु, पक्षाने गोडसेंना चाल दिली आणि ते निवडूनही आले. आता २०२४ च्या निवडणुकीत पक्ष आपला विचार करेल की नाही याची खात्री वाटत नसल्याने खासदार गोडसे यांनी शिंदे गटाचा पर्याय निवडलेला दिसतो. केवळ शिंदे गटाकडूनच नव्हे तर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणूनही त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. २०२४ च्या निवडणुकीत गोडसे विजयी झाले तर हॅट्ट्रिक साधणारे खासदार म्हणून नवा विक्रम त्यांच्या नावापुढे लिहिला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -