घरमहाराष्ट्रनाशिकलोखंडेंचे खासदारकीचे स्वप्न दुसर्‍यांदा पूर्ण

लोखंडेंचे खासदारकीचे स्वप्न दुसर्‍यांदा पूर्ण

Subscribe

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी मतदारसंघात शिवसेनेने तिसर्‍यांदा भगवा फडकवला आहे.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी मतदारसंघात शिवसेनेने तिसर्‍यांदा भगवा फडकवला आहे. विखेंचे होमपीच असल्यामुळे त्यांची भुमिका महत्वाची ठरली यामुळे दुसर्‍यांदा सदाशिव लोखंडेंना खासदारकीचे स्वप्न पूर्ण करता आले. लोखंडेविरोधात वातावरण असूनही काँगेसमधील दुफळ्यामुळे भाऊसाहेब कांबळेंना पराभवाचे तोंड बघावे लागले. कांबळेसाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुर्ण ताकतनिशी मैदानात उतरूनही काही करिश्मा करू शकले नाही. ससाणे गटाने पुकारलेला असहकार, विखेंचा विरोध या गोष्टी कांबळेना मारक ठरल्या.

काहीशी दुर्लक्षित शिर्डीची निवडणूक प्रचार दरम्यान माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे अंतिम टप्प्यात चांगलाच तापली. शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे, अपक्ष व भाजप बंडखोर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह २० उमेदवार रिंगणात होते. आतापर्यंत नगर आणि शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुका एकाच दिवशी होत. यंदा प्रथमच या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होत असल्याने राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना तसेच समर्थकांनाही दोन्हीकडील प्रचार नियोजनाला पुरेसा वेळ मिळाला. युती आणि काँग्रेस आघाडीसह अन्य पक्षांकडूनही आधी नगर मतदारसंघाच्या प्रचार नियोजनाला महत्व दिले गेले. त्यानंतर शिर्डीचे प्रचार नियोजन हाती घेतले गेले. लोखंडेंसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. तर कांबळे यांच्यासाठी संगमनेरात राहुल गांधी यांची सभा झाली. भाजपने नगरमध्ये युतीकडून डॉ. सुजय विखेंना उतरवले असल्याने नगर शहर आणि दक्षिण जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेची ताकद तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील विखेंच्या यंत्रणेची ताकद शिर्डीमध्ये शिवसेनेसाठी कार्यरत होती, असे दिसून आले.

- Advertisement -

विखेंची रसद आली कामाला

नगरचे मतदान संपल्यानंतर विखेंनी शिर्डीच्या निवडणुकीकडे लक्ष दिले. राधाकृष्ण विखे स्वत: आता मतदार संघात फिरत सेनेच्या उमेदवारासाठी मोर्चेबांधणी करत होते. विखेंच्यासह युतीला टक्कर देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली होती. खुद्द थोरातांनी कांबळेसाठी मतदारसंघ पिंजून काढला. परंतु, या गोष्टी निष्प्रभ ठरल्याचे निकालातून समोर आले आहे. सुजय विखेंनी युतीला शिर्डीत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. नगरच्या मतदानानंतर सुजय विखेंची फौज लोखंडेच्या मदतीत मैदानात उतरली

ससाणे गटाची नाराजी भोवली

भाऊसाहेब कांबळे यांच्या एका वक्तव्यानंतर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी नाराज होऊन पदाचा राजीनामा दिला. यानंतर कोणत्याही परिस्थितीत कांबळेंना मदत न करण्याचा पवित्रा घेऊन ससाणे समर्थकांची मोट बांधली. समर्थकांचा मेळावा घेऊन कांबळे विरोध करण्याचे ठरवले. या मेळाव्यास विखेंची उपस्थितीने पुढील चित्र काय असणार, हे ही स्पष्ट झाले.

- Advertisement -

जनतेत नाराजी होती

खासदार लोखंडे यांच्या विरोधात स्थानिकतेचा मुद्दा प्रचार दरम्यान चालवला गेला. स्थानिक होण्यासाठी लोखंडे यांनी निवडणुकीचा बिगुल वाजताच आपल्या श्रीरामपूरच्या नवीन घराची वस्तूशांती करून स्थानिक झाले. गेल्या पाच वर्षात ते मतदारसंघात फिरकलेले नसल्याने शिवसैनिक व जनतेत नाराजी होती. परंतु, याचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे निकालानंतर समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -