त्र्यंबकेश्वरच्या खंबाळे शिवारात पर्यटकांची लूट

पोलिसांकडून टवाळखोरांना अटक; निसर्गप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

नाशिक : पावसाने जोर धरताच जिल्ह्यातील नयनरम्य पर्यटन स्थळांवर निसर्गप्रेमी पर्यटकांची गर्दी होत असताना गावगुडांकडून त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिरावणी – खंबाले या गावातील असलेली टेकडीवर गावगुडांचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागला. पोलिसांनी अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पर्यटनप्रेमींनी केली आहे.

खंबाळे शिवारातील छोट्या टेकडीवर निर्सगाचा आनंद घेण्यासाठी गेलेले 12-15 युवक दारू पिऊन रस्त्यावर दहशत घालत होते. रिकाम्या दारूच्या बाटल्या फोडत होते. याचवेळी टेकडीवर फिरायला आलेल्या पर्यटकांना लुटण्याचे नियोजन त्यांनी केले. काहितरी कुरापत काढायची म्हणून ‘आमच्या आंगावर गाडी का घातली?’ ‘आमची गाडी का फोडली?’ असे अनेक प्रश्न विचारून दारूच्या नशेत त्यांना दमदाटी केली.

आम्हाला 10 हजार रुपये भरपाई द्या नाहीतर तुमची गाडीच फोडून टाकतो, अशी धमकी या गावगुंडांनी दिली. त्यातील दोघांनी समयसूचकता दाखवत 100 या नंबरला कॉल करून चालू असलेली दहशत पोलिसांना कळवले. तोपर्यंत पैशांसाठी धमक्या देणे सुरुच असताना शेवटी या पर्यटकांनी 5 हजार रुपये ऑनलाईन सेंड केले. पोलीस येताच त्यांना सर्व घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी या गुंडांना ताब्यात घेतले.