घरमहाराष्ट्रनाशिकबेमोसमीच्या तडाख्यात शेतकर्‍यांचे नुकसान

बेमोसमीच्या तडाख्यात शेतकर्‍यांचे नुकसान

Subscribe

तालुक्यातील कांदा, द्राक्ष आणि इतर शेतमाल पीक सापडले अवकाळीच्या तडाख्यात

लासलगाव : अतिवृष्टीने झालेले नुकसान कमी होते की काय आता त्यात अवकाळीची भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून लासलगाव व परिसरात ढगाळ हवामानामुळे तापमानात अचानकपणे वाढ झाल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. बुधवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस बरसल्याने द्राक्ष, कांदा, मका उत्पादक शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली.

बुधवारी रात्री जोरदार बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची कमालीची दमछाक होतांना दिसून आली. परिसरातील द्राक्ष बागेचे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या छाटण्या पाहता ऐन फुलोरा स्टेजमध्ये असलेले द्राक्ष घड कुजण्याचे प्रमाण वाढते. यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असून उत्पादन घटणार आहे. त्यात औषध फवारणीचा खर्च वाढणार तसेच सोंगणी झालेल्या मका, मक्याच्या दाण्याखाली पावसाचे पाणी गेल्याने त्याची प्रत खराब होणार असून त्याचे भावावरती परिणाम होणार आहेत. या पावसाने ब्राम्हणगांव, विंचूर येथील शेतकरी अरूण दत्तात्रय गवळी यांच्या काढून ठेवलेल्या मक्याचे दाणे मोठ्या प्रमाणात ओले झाल्याने नुकसान झाले आहे.

- Advertisement -

तालुक्यातील कांदा, द्राक्ष आणि इतर शेतमाल पीक अवकाळीच्या तडाख्यात सापडल्याने हातातोंडाशी आलेला घास आपल्या पदरात पडेल की नाही याची चिंता शेतकर्‍यांना सतावू लागली आहे. तसेच लाखो रुपये खर्च करून पिकांसाठी केलेला लागवड खर्च देखील पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने सार्‍यांची एकच धांदल उडाली. सध्या शेतात काढून ठेवलेला मका भिजला आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसत आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण होत असताना आता अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे नुकसान होऊ लागले आहे. फळबागांवर या अवकाळी पावसाचा परिणाम झालाच आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -