घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रव्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

गावात प्रेमसंबंध समजल्याने अन् अल्पवयीन असल्याने उचलले टोकाचे पाऊल

प्रेमसंबंधाची माहिती गावातील लोकांना झाली असून, अल्पवयीन असल्याने लग्न करता येणार नाही, या कारणातून नैराश्यग्रस्त प्रेमीयुगुलाने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.१४)रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान देवळा शहरातील वेलकम हॉटेलमध्ये घडली. दोघांना वेळीच उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्याने प्राण वाचले आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक रामदास गवळी यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हॉटेल मॅनेजर दीपक सुभाष आहिरे (रा. चिरा, ता.बागलाण) व प्रेमीयुगुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, एका खाजगी क्लासमध्ये संगणकाचे प्रशिक्षण घेत असताना क्लासमधील १८ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलीची ओळख झाली. दोघांमध्ये संवाद सुरु झाल्याने त्यांच्या मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दररोज दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. मात्र, दोघांच्या प्रेमसंबंधाविषयी गावातील काही लोकांना माहिती मिळाली. ही बाब प्रेमीयुगुलाच्या लक्षात आली. गावातील लोक आपल्यावर पाळत ठेवत आहेत.अल्पवयीन असल्याने लग्न करता येणार नाही, या नैराश्यतून दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.

- Advertisement -

प्रेमीयुगुलाने देवळा शहरातील वेलकम हॉटेलमध्ये गुरुवारी (दि.१४) रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे स्टेटस मित्रांनी बघितल्याने त्यांनी हॉटेलकडे धाव घेत दोघांनाही उपचारार्थ देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर दोघांना पुढील उपचारार्थ मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या कुटुंबियांनी तिला प्रयास रुग्णालय, मालेगाव येथे दाखल केले आहे. आता दोघांची प्रकृती स्थिर आहे.

दोघांनी जबाबसुद्धा दिला एकसारखाच

पोलिसांनी मालेगाव रुग्णालयात मुलाचा जबाब घेतला. १७ वर्षी मुलीशी प्रेमसंबंध आहे. प्रेमसंबंधाची माहिती गावातील लोकांना समजली. दोघांना लग्न करायचे आहे. मात्र, वय १८ वर्षे पूर्ण नसल्याने लग्न करता येत नव्हते. त्यातून दोघांनी संगनमताने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर पोलिसांनी मुलीस विचारणा केली असता तिनेसुद्धा प्रियकरासारखाच जबाब दिला.

- Advertisement -

हॉटेलमध्ये ना रजिस्ट, ना ओळखपत्राची पाहणी

पोलिसांनी देवळ्यातील वेलकम हॉटेलमध्ये चौकशी केली असता मॅनेजर दीपक आहिरे यांना दोघांबाबत विचारणा केली . दोघांना हॉटेलमधील एक रुम भाडेतत्वावर उपलब्ध करुन दिली. त्यावेळी आधारकार्डसह ओळखपत्राची पडताळणी केली नसल्याचे आहिरे यांनी पोलिसांना सांगितले. तसेच, नोंदणीसाठी हॉटेलमध्ये रजिस्टरच नसल्याचे समोर आले आहे. त्यातून आहिरे यांनी शासकीय आदेशाचे उल्लंघन करत दोघांना रुम उपलब्ध केल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -