घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यातील नांदगाव मध्ये माथेफिरूचा रेल्वे पोलिसावर चाकूहल्ला

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मध्ये माथेफिरूचा रेल्वे पोलिसावर चाकूहल्ला

Subscribe

नांदगाव : येथील रेल्वे स्थानकावर एका माथेफिरूने रेल्वे पोलीस उपनिरीक्षकावर चाकूहल्ला करत गंभीर जखमी केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. हल्ल्यानंतर उपनिरीक्षक डी. के. तिवारी हे बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने मालेगावी उपचारार्थ दाखल करण्यात आले. या हल्लेखोर माथेफिरुने त्याच चाकूने स्वत:लाही जखमी करून घेतले. सुकेश लिलाधर तिरडे (२५, रा. गोंदिया) असे या माथेफिरूचे नाव असून, त्याला पोलिसांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

पहाटे एक व्यक्ती फलाटावर संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पाहून रेल्वे पोलीस खान यांनी त्याला पोलीस कक्षात आणून बसवले आणि ते तोंड धुण्यासाठी बाहेरच्या नळाकडे गेले. दरम्यान पोलीस कक्षाच्या दाराजवळ हा युवक दबा धरून उभा होता. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक डी. के. तिवारी यांनी कक्षात प्रवेश केला. मात्र बेसावध असलेल्या तिवारींच्या पोटात या युवकाने चाकू खुपसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गांगरलेल्या तिवारींनी कशीबशी आपली सुटका करून घेत ते बाहेर धावले.

- Advertisement -

दरम्यान हा तरुण माथेफिरु असल्याचे सांगण्यात येते. त्याने याच चाकुने त्याचक्षणी स्वत:च्याही पोटावर व मानेला जखमा करून घेत जमिनीवर रक्त पाडले. ‘माझ्या जीवाला धोका आहे’ असे म्हणत त्याने फलाटावर दहशत निर्माण केली आणि तेथून पळ काढत फलाटाला उभ्या असलेल्या कोळशाच्या बोगीवर चढला. हातातला चाकू दाखवून ‘तुम्हाला मारीन नाही तर माझ्या पोटात खुपसून घेईन’ अशा धमक्या देत त्याने कोळशाच्या ढिगावर उभा राहून बराच वेळ धिंगाणा घातला. अखेर चेतन इघे या युवकाने मित्रांच्या मदतीने त्याला दगड मारण्याची धमकी देत खाली उतरण्यास सांगितले. मात्र, खाली उतरूनही तो कोणाला जवळ येऊ देत नव्हता. अखेर वाल्मिक पवार, चेतन इघे, विशाल निकम या सर्व तरुणांनी मिळून पोलिसांना सहकार्य करत या माथेफिरूला पकडले आणि चाकू हिसकावून घेतला. या युवकाला ताब्यात घेतल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राख, उपनिरीक्षक शब्बीर शेख, जावेद शेख, कैलास आहेर व निवृत्त हवालदार शिवाजी इघे हे पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -