महानगर इपॅक्ट : रामसेतू पूलावर पोलीस तैनात

नाशिक : गोदावरीला आलेल्या पुरानंतर रामसेतू पूल धोकादायक बनल्यानंतरही त्यावरुन नागरिकांकडून जीवघेणा वापर सुरूच असल्याचे वृत्त आपलं महानगरने प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात केला. याशिवाय, महापालिकेने आपला फलकही काढून घेतला आहे.

शहरातील भांडी बाजार आणि सरदार चौक यांना जोडणारा रामसेतू पूल नागरिकांना पादचारी व वाहनांसाठी शुक्रवारपासून (दि. १५) बंद केला आहे. बॅरिकेड्स लावतानाच, पालिका व स्मार्ट सिटी कंपनी या दोघांनी त्यावर बंद बाबत वेगवेगळे बॅनर लावले होते. असे असतानाही पुलावरुन मोठ्या संख्येने वर्दळ सुरू होती. यासंदर्भातील वृत्त आपलं महानगरमधून प्रसिद्ध होताच महापालिकेने बॅरिकेड्सवरील पालिकेच्या नावाने असलेले बॅनर काढून घेतले. तसेच, पुलावरुन जाणार्‍या नागरिकांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे रविवारी (दि. १७) दिसून आले. रविवारी सकाळी या ठिकाणी केवळ स्मार्ट सिटी कंपनीचा एकमेव बॅनर लावलेला होता. त्यामुळे आता या पुलाची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.