पोलीस दलात मोठ्या बदल्या; नवीन पोलीस अधिकार्‍यांना गुन्हेगारी, अवैध धंदे, अपघात रोखण्याचे आव्हान

नाशिक : शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात रखडलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बढत्या व बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये अनेक पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हानिहाय झाल्या आहेत. मात्र, नाशिक पोलीस आयुक्तालयासुद्धा नियुक्त झालेल्या जुन्या व नवीन पोलीस अधिकार्‍यांना गुन्हेगारीचा आढावा घेत खाकीचा वचक वाढवावा लागणार आहे. शिवाय, अवैध धंदे, अपघात रोखण्यासह सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असणार आहे.

नाशिक शहरात घरफोडी, सोनसाखळी चोरी, फसवणुकीच्या घटनांची मालिका सुरु आहे. शिवाय, जुन्या भांडणातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी घटना घडत आहेत. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. महाविद्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरांचा मुलींसह महिलांना त्रास होत आहे. २१ लाख लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ मर्यादित असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रतिबंधित कारवायांसह गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात वरिष्ठ अधिकार्‍याची बदली झाली तर नवीन पोलीस अधिकारी येईपर्यंत टवाळखोर, गुन्हेगार या संधीचा गैरफायदा घेत गुन्हे करत असल्याचे आजवरच्या घटनांवरून समोर आले आहे.

शिवाय, नवीन पोलीस अधिकार्‍यांना पोलीस ठाणेहद्दीतील बारकावे माहिती करून घेण्यात ठराविक वेळ लागतो. पोलीस ठाणेहद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुन्ह्यांचे प्रकार, बेशिस्त वाहतूक, अवैध धंद्याची माहिती व उपाययोजना याची माहिती नवीन पोलीस अधिकार्‍यांना करून घ्यावी लागणार आहे. तरुणाईमध्ये भाईगिरी क्रेझ असून, त्यातून अनेक गटांमध्ये हाणामार्‍या होत आहे. त्यामुळे टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यासह नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी नवीन पोलीस अधिकार्‍यांना खाकीचा वचक निर्माण करावा लागणार आहे.

ही आहे आव्हान 

  • शहरात घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटना आटोक्यात आणत चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या लागणार आहेत.
  • शहरात बेशिस्त वाहनाचलकांमुळे वाहतूककोंडीत भर पडत असून, अपघात घडत आहेत. पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासह बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावा लागणार आहे.
  • सायबर गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, शहरातील नागरिकांना आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. ते रोखण्यासाठी पोलिसांना आधुनिक कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे.