नाशिकचा शाश्वत विकास तिर्थाटनाप्रमाणे करा : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

नाशिक : गोदावरी नदीच्या सौंदर्यीकरणापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. पर्यटनापेक्षा तिर्थाटनाच्या अंगाने नाशिकची विकासकामे व्हावीत, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले. महानगरपालिका मुख्यालयात ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या अभियानासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अशासकीय सदस्य राजेंद्रसिंग यांनी या बैठकीत नदीप्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. राजेंद्रसिंह पुढे म्हणाले की, नाशिक शहर पर्यटनापेक्षा तिर्थाटनासाठी ओळखले जाते. तिर्थाटनाच्या अनुषंगाने शहराची विकासकामे करणे योग्य राहील. गोदावरीचा नैसर्गिंक प्रवाह थांबला आहे. नदी बारमाही कशी प्रवाहित करता येईल, याबाबत पुढील आराखडा तयार करणे गरजेचे आहे, नदीच्या सौंदर्यीकरणापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. शासकीय व अशासकीय सदस्यांच्या माध्यमातून शासनाने अभियानाला गती देऊन चांगले काम केले असल्याचे राजेंद्र सिंह म्हणाले.

बैठकीच्या सुरुवातीला नाशिकचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी प्रास्ताविक केले. महापालिकेकडून गोदावरी नदी आणि उपनद्यांचे संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच ‘नमामी गोदा’ प्रकल्पातील संक्षिप्त बाबींचे सादरीकरण केले. महापालिकेच्या सल्लागार कंपनीने यावेळी सादरीकरण केले. पालिकेचे आठ एसटीपी प्रकल्प, 16 नाले यांची माहिती देऊन प्रस्तावित उपाययोजनांची माहिती दिली. या कंपनीला सहा महिन्यात प्रकल्प अहवाल पालिकेला सादर करावयाचा आहे. या सादरीकरणानंतर अभियानाचे राज्य समन्वयक राजेश पंडीत यांनी या अभियानंतर्गंत केलेल्या अभ्यासाचा गोषवारा सांगून संवाद यात्रेला सुरुवात केल्याचे सांगितले. त्यानंतर जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. बैठकीला गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख तथा उपायुक्त विजयकुमार मुंढे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, अभियानाचा ब्रँण्ड अँम्बेसिडर चिन्मय उद्गीरकर, राह फाऊंडेशनचे शरयू कामत, सत्संग फाऊंडेशनचे अमेय नातू, ओलगा, हेल्पिंग हँण्ड फाऊंडेशनचे उदय पानसरे, पर्यावरणप्रेमी चंद्रकांत पाटील, सिने अभिनेते किरण भालेराव, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम उपस्थित होते.

आयुक्तांच्या कामाचे कौतुक

बुलढाण्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी धरणातील गाळ काढण्याची मोहिम यशस्वी केली होती. त्या कामाचे कौतुक करुन राजेंद्र सिंह यांनी आयुक्तांकडून नाशिकमध्येही नदी स्वच्छतेबाबत विशेष कामाची अपेक्षा व्यक्त केली. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गोदावरी प्रदुषणमुक्त राहण्यासाठी अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. नदी स्वच्छतेबाबत काम करणार्‍या संस्था आणि आबालवृद्धांच्या सहभागातून पालिका उपाययोजना करेल, शहरातील नाल्यांचे पाणी गोदावरीत जाणार नाही, असा प्रयत्न राहिल, असे आयुक्तांनी सांगितले.