मांडुळाची तस्करी करणारा गजाआड

नाशिक शहर पोलिसांनी जप्त केलेले मांडूळ

मांडुळ सर्पाची तस्करी करण्यासाठी मांडुळाला घरात डांबून ठेवणार्‍या तस्काराला नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक मांडूळ जप्त केले. इंदिरा घरकुल, करंजवन (ता. दिंडोरी) येथील संशयित रमेश वसंत लकारे (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या सर्प तस्कराचे नाव आहे.

तपोवन रस्त्यावरच्या एका मॉलजवळ एकजण मांडुळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शोध शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांना मिळाली. त्यांनी याबाबत तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांना माहिती दिली. त्यांच्या आदेशान्वये पथकाने सापळा रचत लकारेला अटक केली. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याजवळच्या प्लॅस्टिक गोणीत एक जीवंत मांडूळ आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करत मांडुळ ताब्यात घेतले. ते मांडूळ पोलिसांनी पश्चिम वनविभागाकडे सोपविला आहे.