मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीविनाच रंगणार सारस्वतांचा मेळा

मानेवरील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan

नाशिक शहरात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर नुकतीच मणक्याची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ते साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता धूसरच आहे. मूळात, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिला गेल्याने मुख्यमंत्र्यांविनाच सारस्वतांचा मेळा होऊ शकतो.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मनक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर त्यांची फिजिओथेरेपी सुरू झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर आराम मिळावा म्हणून डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. नाशिक येथे ३ ते ५ डिसेंबर रोजी होणार्‍या मराठी साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची घोषण नुकतीच आयोजकांनी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांना सध्या आरामाचा सल्ला देण्यात आल्याने त्यामुळे ३ डिसेंबर रोजी होणार्‍या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकतील का, असा प्रश्न आहे.

गीतकार अख्तर यांच्या उपस्थितीवरुन वाद

गीतकार जावेद अख्तर हे साहित्य संमेलन उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांच्या उपस्थितीस विरोध वाढू लागला असून पुण्यातील एका संस्थेने तीव्र आक्षेप घेतला आहे. जावेद अख्तर हे मराठीतील साहित्यिक नाहीत. त्यामुळे त्यांना उद्घाटक म्हणून बोलावू नये, यासाठी ब्राह्मण महासंघानेही आयोजकांना निवेदन दिले होते.