Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र हुतात्म्यांचा चौक "भद्रकाली"

हुतात्म्यांचा चौक “भद्रकाली”

Subscribe

वाचकांना व जिज्ञासू मंडळींना ओझरता ज्ञात व्हावा म्हणून जुन्या नाशिकसह तत्कालीन जे भाग पेशवेकाळात विकसित करण्यात आले. त्या जुन्या, नव्या नाशिकची प्रदक्षिणा पूर्णत्वाच्या मार्गाकडे वाटचाल करते आहे. नाशिक शहरातील धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला-क्रीडा, उद्योग किंबहुना सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित असा नगरातील कुठला विभाग आहे, असा जुन्या नाशिककरांना प्रश्न विचारला, तर क्षणार्धात भद्रकाली असे उत्तर मिळेल.

पेशव्यांनी नाशिकच्या अभ्युदयासाठी सरस्वतीपलीकडे वसविलेल्या वसाहतींचा नवापुरा हा प्रमुख भाग होता. ग्रामदेवता श्री भद्रकालीच्या मंदिरापासून नवापुर्‍याकडे जाणारा प्रमुख रस्ता म्हणजे अर्थातच भद्रकालीच्या वास्तव्याने पुनित झालेला हा भद्रकाली रस्ता. मराठी कालखंडापासून आजपावेतो आपल्या नावात परिवर्तन नसलेला, जुन्या व नव्या नाशिकशी भावनिक नाते जोडणारा, हा एकमेवाद्वितीय विभाग आहे. दगडी रस्ते प्रथमत: डांबरी आणि सिमेंट काँक्रिटचे झाले. त्याची सुरूवात याच रस्त्यापासून (मेनरोडवरून) झाली.

- Advertisement -

नाशिकच्या वाहतूक क्षेत्रातील नावीन्य असणारी घोडागाडीची व नंतर वाफेची ट्राम याच रस्त्यावरून दिमाखात आपल्या प्रवासाला निघत असे. देवळाली, नाशिकरोड, गांधीनगर येथे नोकरी व्यवसायानिमित्त जाणार्‍या सायकलस्वारांचा तांडा रामप्रहरी जाताना रामनामाचा गजर करीत जात असे. धार्मिक कार्य असो वा व्यावसायिक, नाशिक रोड, देवळाली, भगूरकडे जाणारे प्रवासी व स्थानिक नागरिक यांच्यासाठी टांगा स्टँड, टॅक्सी व खासगी गाड्यांचा व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एस.टी. महामंडळाचा कारभार याच विभागातून सुरू झाला. पूर्वी पेशवे व मराठा सरदार आपले ऐश्वर्य मिरवित याच मार्गाने जात असत. पर्वणी, सण, उत्सव यासाठी गौतमी गंगेत स्नानासाठी व देवदर्शनार्थ आलेले असंख्य भाविक तसेच संत, साधू, गोसावी, बैरागी या शहरात आले, की अनेक मठाची व पंथाची त्यांच्या सांप्रदायातील शिष्यांसह मिरवणूक, शिवजयंती, गणेशोत्सव विसर्जन, निरनिराळ्या समाजाच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त, थोरामोठ्यांच्या निरनिराळ्या परिषदांच्या प्रारंभाच्या, निवडणुकीतील विजयोत्सव किंवा सत्याग्रह आंदोलन, अनेक महानुभावांच्या महानिर्वाणाच्या आणि सर्वसामान्यांच्या अंत्ययात्रा, अशा एक ना अनेक उपक्रम किंवा घटना यांचा स्पर्श भद्रकाली रस्त्यास होत नाही असा प्रसंग विरळाच ठरावा. असा हा भद्रकाली व मेनरोड (कै. देशपांडे पथ), सध्याचा गाडगे महाराज चौक येथे एकत्र येतो. या चौकातील, त्यातील काही मान्यवर व्यक्ती व संस्था यांचा नामनिर्देश मागील लेखात केला आहे. उर्वरित या लेखात करतो आहे.

नाशिकमध्ये कलाकुसरीने युक्त अशी मंदिरे व वास्तू आहेत. तथापि, आपल्या कलेने उत्तम आकर्षक, विलोभनीय असा ताजमहाल दिवाळीच्या दिवसात या चौकात उभारला जात असे. या किमयागारीचे कलावंत होते मूळ दिल्लीचे नाशिककर झालेले रहिवासी भगतजी हॉटेलचे संचालक श्रीमालू भगत महाराज. आपल्या दुकानातील सर्व प्रकारच्या मिठाईचा कलाकौशल्याने वापर करून प्रचंड ताजमहाल ते दर वर्षी उभा करून आश्चर्यमुग्ध करीत असत. दृष्टीला व जिव्हेला भावणारे हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी मेनरोड व भद्रकाली चौक जमावाच्या उपस्थितीने गोदाकाठाच्या प्रवाहासारखा भासत असे. रात्रंदिवस उघडे असणारे चहा, नाश्ता व मिठाई, या प्रसिद्ध दुकानात याकामी दुधाचा मबलक वापर करावा लागत असे. भाऊ राजे लोखंडे, देशमुख, आबासाहेब बंबाळे, दामुअण्णा देवडिगा, चांदमामू आणि म्हसूजी भालेकर यांची पानाची दुकाने आबालवृद्धांना परिचित होती. बॉम्बे सुपारी व गोकुळशेठ पानवाले यांचे कच्ची पाने विक्रीचे दुकान हे आगळेवेगळे वैशिष्ट्य होते. नाशिकचे प्रथम महापौर लोकनेते शांतारामबापू वावरे यांच्या अनेक राजकीय, सामाजिक तत्सम संस्थांचा कारभार कार्यालयातून होत असे. किंबहुना व्यापक प्रमाणात तो बॉम्बे सुपारी व शंकरराव जंत्रे यांच्या दुकानाच्या फलाटावरून चालत असे. बापूंचा कट्टा म्हणून लौकिक या कट्ट्यास प्राप्त झाला होता.

- Advertisement -

शहानू रेस्टॉरंट या चहाच्या दुकानाचे विशेष म्हणजे हे हॉटेल रात्रभर उघडे राहत असे. त्यामुळे गणेशोत्सव, शिवजयंती यांच्या पूर्वतयारीसाठी व विशेषत: नाशिकमधील रंगकर्मी, लेखक, कवी यांना अतिशय सोयीचे होते. अनेक नाट्यसंहितेचे वाचन, मनन आणि आगामी रूपरेषा, मनसुबे या हॉटेलमध्ये चर्चा-संवादातन रंगले आहेत. नाशिकमध्ये सुरूवातीच्या कालखंडात बँकांची संख्या कमी होती. मोजक्या बँकांपैकी एक बँक मा. लालसाहेब यांचे जागते होती. परंतु बँकेप्रमाणेच बई येथील बँकींग व्यवहार अतिशय प्रामाणिकपणे करण्यासंबंधी रतनशी कजारिया व जेठाभाई कजारिया या बंधूंनी बँकेइतकीच विश्वासार्हता जोपासली होती. कजारिया बंधूंचे नाशिक जनरल स्टोअर्स हे कापडाचे दुकान उत्तर महाराष्ट्रातील प्रसिध्द दुकान. श्रभूपतभाई कजारिया यांनी या व्यवसायात नावलौकिक प्राप्त केला. चंद्रकांत भाई, भास्करराव या त्यांच्या परिवारातील सदस्यांची साथ त्यांना लाभली. या संस्थेचे दोन विशेष अतिशय लक्षणीय आहेत. श्री. कजारिया मनमिळावू, निगर्वी व इतरांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व आहे. नाशिक शहरातील पोलीस दलातील फौजदारांपासून प्रथम श्रेणी अधिकारी यांच्या बैठकी या दुकानात रंगत असत. एकत्र जमण्याचे स्थळ म्हणून चौकास ‘फौजदार चौक’ असे नाव प्राप्त झाले होते.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -