मास्टरमाईंड, भूमाफिया रम्मी राजपूतची मालमत्ता होणार जप्त

मंडलिक खूनप्रकरण : न्यायालयाकडून नाशिक शहर पोलिसांना स्टँडिंग वॉरंट

Murder

रमेश मंडलिक यांच्या खूनाच्या घटनेपासून अद्यापपावेतो मास्टरमाईंड, भूमाफिया रम्मी राजपूतसह जगदीश मंडलिक फरार आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून स्टँडिंग वॉरंट मिळवले आहे. त्यानुसार पोलिसांनी फरार आरोपींची स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेण्याचे कामकाज चालू केले आहे. राजपूत व जगदीश मंडलिक फरार राहिल्यास त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यामुळे भूमाफियांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

१७ फेब्रुवारी २०२१ रोजी रमेश मंडलिक (वय ७०) शेतजमिनीवरील विहिरीची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संघटित टोळीचा मुख्य सूत्रधार सचिन त्र्यंबक मंडलिक याने साथीदारांसमवेत कट रचून अक्षय मंडलिक, भूषण मोटकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैर, आबासाहेब भडांगे, भगवान चांगले, बाळासाहेब कोल्हे, गणेश काळे, सागर ठाकरे, वैभव वराडे, जगदीश मंडलिक, रम्मी राजपूत, मुक्ता मोटकरी यांनी खूनाचा कट रचून रमेश मंडलिक यांचा धारदार शस्त्राने खून केला.

पोलीस तपासात मंडलिक यांचा खून संघटित टोळीने केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तपास अधिकार्‍यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. तो प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी मंजूर केला आहे. मंडलिक खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड रम्मी राजपूत आहे. त्याने गुन्हेगारी संघटनेचे मुख्य सूत्रधार सचिन मंडलिक, अक्षय मंडलिक, भूषण मोटकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैर, आबासाहेब भडांगे, भगवान चांगले, बाळासाहेब कोहे, गणेश काळे, सागर ठाकरे, वैभव वराडे, जगदीश मंडलिक, रम्मी राजपूत, मुक्ता मोटकरी, गोकुळ आव्हाड, अमोल कालेकर, सिद्धेश्वर आंडे, दत्तात्रय सुरवाडे, नारायण बेंडकुळे यांच्याविरुद्ध ६ मे २०२१ रोजी मोक्का कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्याकडे तपास सोपविला होता. तसेच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पाच महिन्यात उपनगर, नाशिकरोड, भद्रकाली, गंगापूर पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांमधील संघटित गुन्हेगारी टोळीवर मोक्का कारवाई केली आहे.